पूर्व उपनगरातील नालेस्वच्छता व रेल्वे कल्वर्टच्या स्वच्छता कामांची प्रभाकर शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी
मुंबई, दि १८
रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा. कल्वर्टच्या पातमुखाला मजबूत (टिकावू) जाळ्या बसवाव्यात. जेणेकरून लोकवस्तीतून पावसाच्या पाण्याबरोबर येणारा कचरा नाल्यांमध्ये अडकणार नाही. तसेच पातमुखाला अडकलेला कचरा काढून पावसाळ्यापूर्वी सर्व कल्वर्टची स्वच्छता करावी. रेल्वे रुळांवर आणि रेल्वे स्थानक शेजारील परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये, तसेच जोरदार पावसावेळी मुंबई पूरमुक्त राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे यांनी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाला दिल्या.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. या अंतर्गत स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे यांनी पूर्व उपनगरांतील नालेस्वच्छता आणि रेल्वे कल्वर्टच्या सफाई कामांची आज (दिनांक १८ मे २०२६) प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान श्री. शिंदे यांनी रेल्वे कल्वर्ट, नालेसफाई, पाणी उपसा करणारे उदंचन पंप आदी कामांचा आढावा घेतला.
पूर्व उपनगरातील मुलुंड (पूर्व) मधील देवीकृपा गृहनिर्माण संस्था येथील नीलम नगर नाल्यावरील कल्वर्ट, मुलुंड (पूर्व) येथील रेल्वे यार्ड मधील नानेपाडा नाल्यावरील रेल्वे कल्वर्ट, उषानगर येथील नाल्यावरील रेल्वे कल्वर्ट, कांजुरमार्ग (पश्चिम) येथील क्रॉम्प्टन नाल्यावरील कल्वर्ट, घाटकोपर (पूर्व) मधील देवकीबाई चाळ येथील गौरीशंकर वाडी नाला कल्वर्ट आणि विद्याविहार (पूर्व) येथील रेल्वे स्थानकाशेजारील जॉली जिमखाना नाल्यावरील रेल्वे कल्वर्टची श्री. प्रभाकर शिंदे यांनी पाहणी केली. स्थानिक नगरसेविका श्रीमती राखी जाधव, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी, नगरसेविका डॉ. (श्रीमती) अर्चना भालेराव, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्री. सुनीलदत्त रसाळ, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पूर्व उपनगरे) श्री. संजय इंगळे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता श्री. सचिन पांचाळ यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुलुंड (पूर्व) येथील रेल्वे यार्डातील नानीपाडा नाल्यावरील कल्वर्टच्या पाहणीदरम्यान नाल्याच्या पश्चिम बाजुला मोठी लोकवस्ती असून त्या लोकवस्तीतील कचरा थेट नाल्यात येत असल्याचे आढळून आले. हा कचरा थेट मोठ्या नाल्यात वाहत येत असल्याने नाला तुंबण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेता लोकवस्ती असलेल्या पश्चिम बाजुच्या पातमुखाला मजबूत लोखंडी जाळ्या बसवाव्यात. जेणेकरून कचरा थेट नाल्यामध्ये येणार नाही, अशा सूचना श्री. शिंदे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.
सध्या सुरू असलेली नाले स्वच्छतेची कामे समाधानकारक आहेत. परंतु, पावसाचे पाणी साचू नये यासाठी कामाला वेग देऊन उर्वरित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत. नाले स्वच्छतेची सर्व कामे झाली तर यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही, यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाचा समन्वय महत्त्वाचा आहे. योग्य समन्वय ठेवून दोन्ही प्रशासनाने कामे करावीत, असे श्री. शिंदे यांनी नमूद केले.
कांजुरमार्ग (पश्चिम) येथील टोयो इंजिनिअरिंग कंपनी जवळील क्रॉम्प्टन नाल्यावरील कल्वर्टसह इतर सर्व कल्वर्टच्या भिंतींची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करावी. तसेच कल्वर्टची पातमुखे आणखी विस्तारित होतील, याकडे रेल्वे प्रशासनाने अधिक प्राधान्याने लक्ष द्यावे. कल्वर्टच्या पातमुखाला लागून असलेल्या रेल्वेच्या केबल जमिनीपासून जास्तीत जास्त अंतरावर राहतील, याची काळजी घ्यावी. जेणेकरून या केबल्समध्ये वाहून येणारा कचरा अडकणार नाही. एकूणच, यंदा मुंबईत पाणी न साचता पूरमुक्त मुंबईसाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले.KK/ML/ML