मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी एसआयआरचे प्रशिक्षण शिबिर संपन्न.
मुंबई, दि २६
निवडणूक आयोग सध्या SIR प्रक्रिया राबवत असून मतदार याद्या अद्ययावत करण्याची ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया नेमकी काय आहे व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने यासाठी काय केले पाहिजे, यासाठी मुंबई काँग्रेसच्या BLA- 1 यांच्यासाठी सीएसटी येथील मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे एक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या राष्ट्रीय वॉर रूमचे प्रमुख प्रो. सौरभ वाजपेयी, कायदेविषयक विभागाचे प्रमुख ऍड निशांत मंडल, मुंबईचे प्रभारी राजेश कुमार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
एसआयआर प्रक्रियेतून सत्ताधारी भाजपाला मदत होईल अशा प्रकारे काम होत असल्याचे देशातील अनेक भागातील एसआयआर प्रक्रियेत दिसून आले आहे. लाखो मतदारांची नावे वगळली जात आहेत. मुंबईतही ही प्रक्रिया सुरु होत असून आपल्या भागात मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रियेत संबंधित कार्यकर्त्याने सक्रीय भाग घेतला पाहिजे. मतदार यादीत नाव असण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडणे, एखाद्या मतदाराचे नाव वगळले असल्यास त्याची खातरजमा करणे, हरकती घेणे व निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित वेळेत व त्याच कालावधीत सर्व प्रक्रिया पार पाडल्या पाहिजेत. आपल्या भागातील मतदार यादी अद्ययावत असेल, काही गैरप्रकार होणार नाहीत, यासाठी बारकाईने या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मुंबई काँग्रेस जिल्हा स्तरीय, विधानसभा निहाय आणि ब्लॉक स्तरावरही प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहे,
अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.KK/ML/MS