स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपरिचित काव्य रचनांनी रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले
मुंबई, दि. २६ : हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देणे ही एकच आस, हा एकच ध्यास आणि त्यासाठी देशभक्ती, राष्ट्रभक्ती ही ज्यांच्या रोमारोमात भिनली आहे, ज्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत लढण्याची जिद्द, ऊर्मी आहे त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अपरिचित कवितांचे गायन आणि त्याचा भावार्थ समजावून सांगणे असा कार्यक्रम बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत झाला.
दूरदर्शनवरील सुविख्यात वृत्तनिवेदिका आणि सुसंवादिनी दिपाली श्रीराम केळकर आणि गायिकेचे पाय पाळण्यातच दिसतात अशा वयाच्या अवघ्या तीन वर्षांच्या असतांना पासून गीत गायनाचा रियाज करणाऱ्या कु कांचन संतोष सावंत यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साधारण आठ-नऊ कविता निवडल्या होत्या. त्यातली एक दोन कडवी स्वतःच चाल लावून गायिका कांचन सावंत यांनी सादर केली. त्या कवितांच्या अनुषंगाने प्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांनी सावरकरांचे साहित्य आणि मराठी भाषेसाठीचे त्यांचे मोठे कार्य इतक्या सुंदर पद्धतीने मांडले की उपस्थित भारावूनच गेले.
दीपाली केळकर यांनी सुरुवातीलाच सांगितले की त्या काही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्राच्या किंवा साहित्याच्या तज्ञ नाहीत, अभ्यासक नाहीत. परंतू एकंदरीत त्यांच्या कार्यक्रमाकडे पाहता तयारी मात्र अशी होती की ज्याचं नाव ते. कार्यक्रम ठरल्यावर त्यांनी याची तयारी केली. कोणताही कार्यक्रम बसवायचा असेल तर तयारी कशी करावी याचा आदर्श म्हणजे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपरिचित कवितांचे गायन आणि तदनुषंगिक निरुपण. निवडक कविता, पण त्यासाठी अफाट अभ्यास, बारकाईने नोंदी, कविताच मध्यवर्ती राहतील याची घेतलेली दक्षता, त्यानुसार भावार्थ संहितेची गोळीबंद मांडणी. ते सारे रिचवून, भिनवून अगदी मनापासून प्रेक्षकांना सांगणे…
अतिशय कमाल अनुभव होता. सलग अडीच तास इतका ‘मराठी’ कार्यक्रम होता की सारे रसिक श्रोते अक्षरशः कांचन सावंत आणि दीपाली केळकर यांनी खिळवून ठेवले होते. स्वच्छ, सहज उच्चार, प्रत्येक अक्षर, शब्द, वाक्य विरामचिन्हांसह प्रेक्षकांना कार्यक्रमात खिळवून ठेवता झाला. विशेष म्हणजे गायिका कांचन आणि दीपाली यांची पहिली भेट कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी झाली. कांचन यांनी दीपाली यांना कोणत्या कवितांचे गायन करणार हे समाज माध्यमातून कळविले होते. पण असा एकजिनसी कार्यक्रम झाला की महिने दोन महिने कसून दोघींनी रियाज केला असेल. कार्यक्रम कमालीचा रंगला.
सहकलाकाराचा हुरुप वाढवत कार्यक्रम कसा फुलवायचा हे ही दीपाली केळकर यांच्याकडून शिकण्यासारखे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प कमालीचे यशस्वी ठरले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे अवघे जीवन म्हणजे राष्ट्रभक्तीचा, देशभक्तीचा अथांग सागर. या सागरातील दोन थेंब जरी टिपता आले तरी ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत असलेले कार्य केल्याचे दिसून येईल, अशा शब्दांत सुसंवादिनी दिपाली केळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विजय वैद्य यांच्या कार्याची प्रशंसा करतांनाच त्यांच्या हयातीत मला या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत येता आले नाही, अशी खंत व्यक्त केली.
सूत्रसंचालन प्रा नयना रेगे यांनी करतांना व्यासपीठाजवळील सूरसम्राज्ञी पद्मविभूषण आशा भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतांनाचे विजय वैद्य यांच्या भव्य छायाचित्राची आठवण करून दिली आणि आशाताईंना खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेतर्फे सूरस्वरांजली देण्यात येत असल्याचे आवर्जून नमूद केले.ML/ML/MS