मिठी नदीच्या तीनही पॅकेज अंतर्गत गाळ काढण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात

 मिठी नदीच्या तीनही पॅकेज अंतर्गत गाळ काढण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात

मुंबईतील मिठी नदीच्या तीनही पॅकेज अंतर्गत आणि मोठ्या, छोट्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. ज्याठिकाणी पावसाचे पाणी तुंबते अशा ठिकाणांवर प्राधान्याने आणि सुयोग्य नियोजनासह लक्ष देण्यात यावे. पाणी साचण्याच्या ठिकाणांबाबत (flooding spot)आवश्यक कार्यवाही करून तो निकाली निघेल, अशा पद्धतीने नालेसच्छतेच्या कामांचे नियोजन करावे. नालानिहाय कामे कधी सुरू होणार, कधी संपणार याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे. सदर माहिती नालेसफाईच्या महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून आपल्या परिसरातील नालेसफाईचे काम कधी सुरू होणार आहे व कधी संपणार आहे, याची माहिती नागरिकांना मिळणे शक्य होईल. नालानिहाय दर दिवसाला केल्या जाणाऱ्या कामाचे उद्दिष्ट निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी होईल, याची दक्षता घ्यावी. कंत्राटदाराने निविदा अटीशर्तीप्रमाणे किती यंत्रसामुग्री वापरात आणणे अपेक्षित आहे व दररोज किती यंत्रसामुग्री उपलब्ध आहे, याची अद्ययावत माहिती उपलब्ध करावी. सदर माहिती नालेसफाईच्या संगणक प्रणालीवरसुद्धा (डॅशबोर्ड) प्रदर्शित करण्यात यावी. नाल्यांमधील पाण्यावर वाहणारा तरंगता कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी शक्य तेथे तरंगता कचऱ्याला अटकाव करणारी यंत्रणा (Trash Boom System) लावण्यात यावी, असे विविध निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.

मुंबईतील नाले आणि नद्या स्वच्छतेची कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरातील लहान व मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी मिठी नदी व पूर्व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेस्वच्छता कामांची काल (दिनांक ३ एप्रिल २०२६) प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक १२ मार्च २०२६ पासून गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. पूर्व उपनगरांतील मिठी नदीवर सुरू असलेल्या तीन पॅकेज अंतर्गत पाच ठिकाणी कामांची सुरुवात झाली आहे. त्यापैकी तीन ठिकाणी (कनेक्टर ब्रिज, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील एमएमआरडीए कार्यालय (जेतवन उद्यान) आणि अंबानी शाळालगत) श्री. बांगर यांनी आज भेट दिली. यासोबतच मुलुंड पूर्व (टी विभाग) येथील बाऊंड्री नाला, घाटकोपर (एन विभाग) येथील सोमय्या नाला येथेही भेट दिली. तसेच आवश्यक ते निर्देश दिले. यासोबतच गाळ काढण्याच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून त्यांच्या सूचनांच्या बाबतीत गांभीर्याने पूर्तता करावी, असेही श्री. बांगर यांनी सांगितले.

मिठी नदीसह मोठ्या व छोट्या नाल्यातून गाळ काढण्याची कार्यवाही सुरू आहे. दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत निर्धारित संपूर्ण काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. नाले स्वच्छतेच्या प्रगतीचे सातत्याने निरीक्षण करण्यासाठी संगणक प्रणाली आहे. त्यात दररोज अद्ययावत माहिती भरण्यात यावी, असेही श्री. बांगर यांनी नमूद केले.

मिठी नदीतून एकूण पाच ठिकाणी गाळ काढण्याची कामे प्रभावीपणे सुरू आहेत. ही कामे तीन पॅकेजमध्ये केली जाणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदीजवळील कनेक्टर ब्रिज येथे श्री. बांगर यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मिठी नदीच्या संपूर्ण लांबीमध्ये गाळ काढण्याच्या ठिकाणांचे नियोजन करावे. ज्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती आहे आणि ज्या ठिकाणी मिठी नदीचे पात्र अरुंद आहे अशा ठिकाणी नालेसफाई अधिक काळजीने केली जाईल, याची दक्षता घ्यावी. येत्या ५७ दिवसांच्या कालावधीमध्ये नालेसफाईचे उद्दिष्टे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी दिवसनिहाय कामांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना श्री. बांगर यांनी दिल्या.

वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील एमएमआरडीए कार्यालय (जेतवन उद्यान) येथे मिठी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. या ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या ठिकाणी अवैधरित्या राडारोडा टाकला जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. असे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. बांगर यांनी सांगितले.

अंबानी शाळेलगत मिठी नदीतून गाळ काढण्यात येत आहे. पारंपरिक तंत्रज्ञानासह नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे गाळ काढण्यात येत असेल तर अशा प्रयोगांचे स्वागत करण्यात येईल, असे श्री. बांगर यांनी याठिकाणी सांगितले.

मिठी नदीतून गाळ काढण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने केलेल्या कामांचे योग्य परिक्षण व्हायला हवे. संबंधित कंत्राटदाराने योग्य प्रकारे आणि विहित वेळेत गाळ काढण्याचे काम केले असेल याची खातरजमा करून वेळीच देयक देण्यात यावी. त्यात विलंब व्हायला नको. मात्र, असे करत असताना कामांची गुणवत्ता, सातत्य आणि संगणकीय प्रणालीवरील माहिती अद्ययावत आहे की नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसे आढळून न आल्यास संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, याकडेही श्री. बांगर यांनी लक्ष वेधले.

नालेसफाईच्या कामाच्या दरम्यान अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य
नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या कामाच्या दरम्यान अभियंत्यांची उपस्थिती असणे अनिवार्य आहे. कंत्राटदारामार्फत केल्या जाणाऱ्या कामामध्ये संपूर्ण पारदर्शकता रहावी, यासाठी अभियंत्यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. जर कुठेही जाणिवपूर्वक गैरप्रकार करण्याचा कुणी प्रयत्न केला, असे निदर्शनास आले तर कंत्राटदार व अधिकारी या दोघांवर अत्यंत गंभीर कारवाई केली जाईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना श्री. बांगर यांनी दिल्या.

मुलुंड येथील बाउंड्री नाला येथे सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करताना श्री. बांगर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. कंत्राटदाराने काढलेला ओला गाळ ४८ तास उन्हात वाळल्यानंतरच त्याचे वहन होत आहे की नाही, याकडेही संबंधित अभियंत्यांनी प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला संबंधित कंत्राटदाराने देखील दैनंदिन कामकाजाचा वाहननिहाय तपशील व्हिडिओसह संगणकीय प्रणालीवर अद्ययावत करणे गरजेचे आहे. महानगरपालिका अधिकारी आणि कंत्राटदाराने समन्वयाने काम करत दाटीवाटीच्या वस्तीच्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. मागील वर्षी उषानगर, भांडूप रेल्वे स्थानक आणि जॉली जिमखाना याठिकाणी तसेच हायवे सोसायटीकडून येणाऱ्या पाण्यामुळे चुनाभट्टी रेल्वे स्थानक या ठिकाणी पाणी साचण्याची समस्या उद्भवली नाही. त्याचप्रमाणे नियोजन करण्याचे निर्देश श्री. बांगर यांनी यंत्रणेला दिले.

सोमय्या नाला येथेही श्री. बांगर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, लक्ष्मीबाग, सोमय्या नाला आणि पंतनगर येथे मोरी (कल्व्हर्ट) बसविले आहेत. याबाबत मध्य रेल्वेच्या यंत्रणेनेसोबत संयुक्त पाहणी केली आहे. रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे मोरी (कल्व्हर्ट) मधील गाळ साफ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ती सुद्धा विहित वेळेत पूर्ण केली जाईल याची दक्षता घ्यावी, असेही श्री. बांगर यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीमती कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता श्री. संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *