बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता करातून उच्चांकी टप्पा पार.
मुंबई, दि १
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. मालमत्ता कर संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या ७ हजार ३४१ कोटी रुपयांच्या सुधारित उद्दिष्टाच्या तुलनेत महानगरपालिकेने ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलन केले आहे. दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी एकाच दिवशी ३९९ कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल संकलित करून नवीन विक्रम देखील नोंदविण्यात आला आहे.
महानगरपालिका आयुक्त (श्रीमती) आश्विनी भिडे यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
मुंबईकर नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध नागरी सेवा व सुविधा पुरविल्या जातात. या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी व त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सक्षम आर्थिक स्रोतांची आवश्यकता असते. त्या दृष्टीने, मालमत्ता कर हा एक अत्यंत महत्त्वाचा, स्थिर आणि विश्वासार्ह महसुली स्रोत म्हणून विशेष अधोरेखित होतो.
या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार आणि करनिर्धारक व संकलक श्री. गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली, करनिर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनासाठी व्यापक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे व्यापक व जबाबदारीपूर्ण कामकाज यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरही, करनिर्धारण व संकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर संकलनासाठी उल्लेखनीय समर्पण, सातत्य आणि अपेक्षेपेक्षा अधिक परिश्रम घेतले; ही बाब निश्चितच विशेष उल्लेखनीय आणि अत्यंत कौतुकास्पद आहे.
नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरावा यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. करभरणा सुलभ व्हावा यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आणि ऑनलाइन भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासोबतच, मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करून मागील थकबाकी वसुलीसाठी प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. या सर्व उपक्रमांमुळे मालमत्ता कर संकलन अधिक परिणामकारक आणि गतीमान झाले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७ हजार ३४१ कोटी रुपये मालमत्ता कर संकलनाचे सुधारित उद्दिष्ट ठेवले होते. करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तसेच मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०२५ -२६ या आर्थिक वर्षासाठी दिनांक १ एप्रिल २०२५ ते दिनांक ३१ मार्च २०२६ या निर्धारित कालावधीदरम्यान ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलित करण्यात आले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या १०३.६८ टक्के इतके आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात ३०१ कोटी १३ लाख रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.
प्रशासकीय विभागनिहाय कामगिरीचा विचार करता, दिनांक १ एप्रिल २०२५ ते दिनांक ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षामध्ये के पूर्व (७१९ कोटी २३ लाख रुपये), जी दक्षिण (६७० कोटी ६४ लाख रुपये), के पश्चिम (६२२ कोटी १६ लाख रुपये), एच पूर्व (५७७ कोटी ७८ लाख रुपये) आणि एच पश्चिम (५३६ कोटी ५५ लाख रुपये) या विभागांनी सर्वाधिक मालमत्ता कर संकलन नोंदवले आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये प्रशासकीय विभागनिहाय संकलित मालमत्ता कर –
शहर विभाग –
१) ए विभाग – २७० कोटी ७ लाख रुपये
२) बी विभाग – ४७ कोटी ३१ लाख रुपये
३) सी विभाग – ९० कोटी १४ लाख रुपये
४) डी विभाग – २९९ कोटी ५३ लाख रुपये
५) ई विभाग – १५० कोटी ८ लाख रुपये
६) एफ दक्षिण विभाग – १६५ कोटी ९० लाख रुपये
७) एफ उत्तर विभाग – १५७ कोटी ७६ लाख रुपये
८) जी दक्षिण विभाग – ६७० कोटी ६४ लाख रुपये
९) जी उत्तर विभाग – २५१ कोटी १७ लाख रुपये
एकूण संकलित कर रक्कम – २ हजार १०२ कोटी ६० लाख रुपये
पश्चिम उपनगरे-
१) एच पूर्व विभाग – ५७२ कोटी ७८ लाख रुपये
२) एच पश्चिम विभाग – ५३६ कोटी ५५ लाख रुपये
३) के पूर्व विभाग – ७१९ कोटी २३ लाख रुपये
४) के पश्चिम विभाग – ६२२ कोटी १६ लाख रुपये
५) पी दक्षिण विभाग – ३७२ कोटी २३ लाख रुपये
६) पी उत्तर विभाग – २७७ कोटी २२ लाख रुपये
७) आर दक्षिण विभाग – २८८ कोटी ८१ लाख रुपये
८) आर मध्य विभाग – २९४ कोटी ९४ लाख रुपये
९) आर उत्तर विभाग – ९७ कोटी ४१ लाख रुपये
एकूण संकलित कर रक्कम – ३ हजार ७२१ कोटी ३३ लाख रुपये
पूर्व उपनगरे-
१) एल विभाग – ३०४ कोटी ५७ लाख रुपये
२) एम पूर्व विभाग – ११३ कोटी ९३ लाख रुपये
३) एम पश्चिम विभाग – १८४ कोटी ७० लाख रुपये
४) एन विभाग – २४२ कोटी ३० लाख रुपये
५) एस विभाग – ३९८ कोटी ४७ लाख रुपये
६) टी विभाग – २१३ कोटी ४४ लाख रुपये
एकूण संकलित कर रक्कम – १ हजार ४५७ कोटी ४१ लाख रुपये. JS/ML/MS