उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते ‘वृक्ष संजीवनी’ अभियानाचा झाला शुभारंभ
मुंबई, दि १
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वृक्ष संजीवनी अभियानाचा’ शुभारंभ आज (दिनांक १ एप्रिल २०२६) उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्या हस्ते संपन्न झाला. दहिसर येथील अशोकवन येथे या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने दिनांक १ एप्रिल ते दिनांक ३० एप्रिल २०२६ या कालावधीत संपूर्ण मुंबईत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
मुंबईतील झाडांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वृक्षांभोवती साचलेले सिमेंट- काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्यांचे संरक्षण करण्याचे कामही यामध्ये समाविष्ट आहे.
शिवसेना उपनेत्या श्रीमती संजना घाडी, ‘आर उत्तर’ विभागाचे सहायक उद्यान अधीक्षक श्री. निलेश धनावडे, माजी कसोटीपटू श्री. सुरेश नायक तसेच स्थानिक नागरिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई पब्लिक स्कूल, अशोकवन, दहिसर येथील विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृतीपर गीत सादर केले. तसेच विविध पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी केले.
मुंबईकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होऊन शहरातील हरित संपदा जतन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.JS/ML/MS