सह्याद्रीतील रानमेवा आता वाशीममध्ये
वाशीम दि १२ (राम धनगर ): कोकण किनारपट्टी व सह्याद्रीच्या सदाहरित जंगलांमध्ये आढळणारा रानमेवा म्हणून ओळखला जाणारा पान जांभूळ (वॅक्स अॅपल) अर्थात जांभ आता वाशीमच्या उष्ण कटिबंधीय वातावरणातही बहरला आहे. जिल्ह्यातील शिरसाळा येथील प्रयोगशील शेतकरी दत्तराव इंगोले यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात वॅक्स अॅपलची यशस्वी लागवड करून आर्थिक प्रगतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
दत्तराव इंगोले हे जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण शेती पद्धतींसाठी ओळखले जातात. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी तामिळनाडू राज्यातून वॅक्स अॅपलची ६०० रोपे आणून आपल्या शेतात लागवड केली. या प्रयोगासाठी त्यांना वाशीम कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ दापोली तसेच कृषी विज्ञान केंद्र, करडा येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
सध्या दोन एकरांतील या फळबागेतून इंगोले यांना दरवर्षी अंदाजे ३५ ते ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेत पान जांभूळ अर्थात जांभ १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात असून ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आकाराने घंटीसारखे दिसणारे हे फळ लाल, गुलाबी, हिरवे किंवा पांढऱ्या रंगाचे असते. पान जांभूळ, रानजांभूळ, गुलाबी सफरचंद, जांभ अशा विविध नावांनी ते ओळखले जाते. या फळात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने उन्हाळ्यात शरीराला पोषक ठरते. गोड चव आणि कमी कॅलरीमुळे वजन नियंत्रणासाठीही ते उपयुक्त आहे. तसेच क जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असल्याने आरोग्यास लाभदायक ठरते. हे फळ ताजे खाण्यासोबतच लोणचे, ज्यूस आणि जॅम तयार करण्यासाठीही वापरले जाते.
वॅक्स अॅपल अर्थात पान जांभळाचा उगम दक्षिण-पूर्व आशियातील इंडोनेशिया, मलेशिया आणि जावा द्वीपसमूहात झाला आहे. भारतात दक्षिण व पश्चिम किनारपट्टी तसेच सह्याद्रीच्या किनारी सदाहरित वनक्षेत्रात ही झाडे आढळतात. अनेक आदिवासी समुदाय या रानमेव्याची विक्री करतात. वाशीम जिल्ह्यात या फळाची यशस्वी लागवड करून दत्तराव इंगोले यांनी शेतकऱ्यांसाठी नवी दिशा निर्माण केली आहे, अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी गजानन इढोळे यांनी दिली.
पान जांभूळाचे झाड सदाहरित असून मुबलक पाणी उपलब्ध असल्यास त्याची वाढ चांगली होते. इंगोले यांनी ठिबक सिंचन (ड्रिप इरिगेशन) आणि मल्चिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून दोन एकरांतील बाग फुलवली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्च कमी झाला असून उत्पादनात वाढ झाली आहे अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, करडा येथील कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. दिगांबर इंगाले यांनी दिली.ML/ML/MS