माजी सरन्यायाधीश भूषण गवई शाळेच्या आठवणीने गहिवरले
मुंबई, दि १०: चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलच्या १९७६ बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच गिरगाव येथे शाळेच्या वागळे सभागृहामध्ये संपन्न झाले . भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे देखील या बॅचचे माजी विद्यार्थी नात्याने या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहून ते शाळेच्या रम्य आठवणीने गहिवरून गेले.
या कार्यक्रमाला इजराइल, युरोप, अमेरिका इत्यादी देशातूनही विद्यार्थी आले होते. कार्यक्रमाला खास त्यावेळच्या शिक्षिकांना ,सरांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले गेले होते .यातील काही शिक्षक आवर्जून उपस्थित राहिले. होते परंतु काही वयोमानपरत्वे येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी चल चित्रांद्वारे आपल्या शुभेच्छा मुलांना पाठवल्या होत्या.
शाळेने केलेल्या प्रेम ,संस्कार यांची आयुष्यावरती जी छाप पडली ती कधीच गेली नाही. मित्रांबरोबर केलेली दंगामस्ती खेळाच्या तासाला गच्चीवर केलेली धम्माल ,पडल्यानंतर लावलेलं लाल औषध, कॅन्टीनमध्ये मिळणारा पट्टी समोसा कधीच विसरू शकलो नाही असे म्हणत शाळेच्या आठवणी जागवल्या.
सर न्यायाधीश असतानाच्या काळात शाळेने बोलवून केलेला सत्कार हा खूपच हृदयस्पर्शी असल्याचे माजी भूषण गवई यांनी भावुक होऊन सांगितले. गवई यांच्या बॅच तर्फे शाळेला राष्ट्रध्वज सन्मानाने भेट देण्यात आला त्यावेळी सगळ्यांनी उठून देशाचा जयजयकार केला तो क्षण अतिशय अंगावर रोमांच आणणारा होता.तसेच एनसीसी व मुलींच्या बँड साठी प्रशिक्षकांचे मानधन व १५ बासऱ्या भेट म्हणून देण्यात आल्या
त्या काळात शाळेच्या समोरील हरीचे दुकान हे सगळ्या विद्यार्थ्यांचे आवडते ठिकाण होते. यात दुकानात मिळणारे चिंचा, बोरे, आवळा, बडीशेप, लिंबाच्या गोळ्या लोकप्रिय होत्या. विद्यार्थ्यांनी असा स्टॉलच वागळे सभागृहाच्या बाहेर मांडला होता. सकाळी साडेदहा वाजता माजी सरन्यायाधीश भूषण गवईंचे आगमन झाले .त्यांना शाळेच्या एनसीसी बटालियन तसेच शाळेच्या मुलींच्या बँडच्या वतीने मानवंदना देण्यात आली. सर्व माजी विद्यार्थी अतिशय भावुक झाले होते.त्यांच्या हयात नसलेल्या साथीदारांना तसेच शिक्षकांना त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच श्रद्धांजली वाहिली व नंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाळेचे ब्रीदवाक्य असलेले शीलम परं भूषणम् हे गीत सर्वांच्याच हृदयाला स्पर्श करून गेले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून अत्याधुनिक म्युझिक सिस्टीम भेट देण्यात आली. मुख्याध्यापिका श्रीमती संचिता गावडे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी जमवलेला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा धनादेश चिकित्सक समूहाचे सचिव डॉ गुरुनाथ पंडित सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. डॉक्टर गुरुनाथ पंडित सर यांनी हा धनादेश बँकेत कायमस्वरूपी ठेव म्हणून ठेवून येणाऱ्या व्याजात तेवढेच व्याज चिकित्सक समूहातर्फे मिळवून येणाऱ्या रकमेतून दर २४ नोव्हेंबरला एका होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनीला पुरस्कृत केले जाईल अशी घोषणा केली २४ नोव्हेंबर हा माजी सरन्यायाधीश श्री भूषण गवई सरांचा वाढदिवस आहे.
शाळेचे विविध उपक्रम सुरू आहेत जसे गतवर्षी २७ फेब्रुवारीला शाळेने केलेल्या जागतिक १००० गाण्यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, मुलांना साहित्यिक किंवा कवी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरता सुरू असलेला अजब गजब या त्रैमासिकाचा उपक्रम, तसेच यावर्षीच्या मराठी भाषा गौरव दिनाला संत साहित्य हा मराठी भाषेचा भक्कम पाया याविषयी होणाऱ्या पुढील कार्यक्रमाबद्दल अवगत केले गेले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अवधूत गोखले, अविनाश पाठक, नितीन आंबर्डेकर यांनी विशेष सहभाग घेतला . विनायक जोशी यांनी शाळेच्या संदर्भामध्ये सुंदरशी ध्वनि चित्रफीत बनवली.
सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सौ. जोस्ना म्हात्रे,माधुरी गोखले,सुबोध पालकर,मोहन नारकर राजीव गोविलकर, संजय होनाळे यांनी करमणुकीच्या कार्यक्रमाचे नियोजन खूप उत्कृष्टपणे केलं.
सर्व जुन्या नव्या आठवणींची छानशी सांगड सतीश सराफ यांनी घातली. सर्व मित्र-मैत्रिणींच्या जुन्या आठवणी त्यांनी आपल्या निवेदनात खास करून उल्लेख केल्या. हा कार्यक्रम पाहण्यासाठी माझी शालेय विद्यार्थ्यांबरोबर विभागातील नागरिक विविध पक्षाचे राजकीय प्रतिनिधी आणि स्थानिक संस्था मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.KK/ML/MS