अरे देवा, महाराष्ट्र विधिमंडळाची
वेबसाईट तर उघडतच नाही !

मुंबई, दि. 19 (ताजेश काळे) : महाराष्ट्र विधिमंडळातील विधानसभा तथा विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची व्यक्तिगत माहिती जाणून घ्यायची उत्कंठा तुमच्या मनात आली असेल आणि तुम्ही लगेच हातातील मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकापुढे बसून गुगलवर सर्च केल्यास तुमच्यासमोर एका क्लिकवर ज्ञानाचा खजिना नव्हे तर चक्क निराशा हाती पडणार आहे. होय हे अगदी खरे आहे, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात महाराष्ट्र विधिमंडळाची “mls.org.in” ही अधिकृत वेबसाईट गेल्या कित्येक दिवसांपासून चक्क बंद असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही वेबसाईट उघडतच नसल्याने हताश जनतेवर डोक्यावर हात ठेवून “अरे देवा, आता काय करू” असे म्हणण्याची पाळी आली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेली महायुती सत्तेवर आली. सुरुवातीला मंत्रिमंडळ गठण, मग खातेवाटप आणि नंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त करण्यावरून विलंब झाला. मंत्रीपदे मिळाली पण या मंत्र्यांची दालने, बंगले ठरविण्यासह खात्याचा कार्यभार सांभाळण्यासाठी आवश्यक स्वीय सहाय्यक (पीएस) आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील लांबणीवर पडल्याचे बघायला मिळाले होते.
या सर्व घोळात महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजासह नवनियुक्त लोकप्रतिनिधींबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, राज्य विधिमंडळाची अधिकृत वेबसाईट उघडतच नसल्याचे दिसून आले. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी ही बाब उजेडात आणली आहे. गुगलवर जाऊन महाराष्ट्र विधानमंडळ असे सर्च केल्यावर आपल्याला विधिमंडळाच्या अधिकृत वेबसाईटची लिंक तर मिळते, पण या लिंकवर क्लिक केल्यास ती उघडतच नसल्याचे निदर्शनास आले आहे.
वेबसाईटच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ” युवर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट” Attackers might be trying to steal your information” Net -ERR_CERL अशाप्रकारचा मेसेज आपल्याला बघायला मिळतो. ही अधिकृत वेबसाईट कोणी हॅक करण्याचा प्रयत्न करीत असेल अथवा इतर कुठला सायबर धोका जाणवत असेल तर राज्यसरकारच्या माहिती – तंत्रज्ञान विभागाने त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
राज्य विधिमंडळाची अधिकृत वेबसाईट गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असली तरीही त्याबाबत विधानमंडळ सचिवालयाने कुठलीही हालचाल केली नसल्याचे जाणवत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पुरोगामी महाराष्ट्राच्या अधिकृत विधिमंडळ वेबसाईटची ही अवस्था बघून जनतेकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
ML/ML/PGB 19 Jan 2025