अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा

शिर्डी, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता आज झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी पक्षाला कशापध्दतीने पुढे न्यायचे आहे याचा कानमंत्र देतानाच इकडेतिकडे करणार्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्माचा आदर करणारा आहे हे कृतीतून दिसले पाहिजे. नेत्यांपेक्षा हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे हेही स्पष्ट झाले पाहिजे. नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांमध्ये जा… हा पक्ष लोकांचा वाटला पाहिजे यासाठी काम करा असा आदेशही पवार यांनी आजच्या शिबिरात दिला.
शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा ही आपली आहे आणि ती कायम राहील. यासाठी तुमची साथ मला हवी आहे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता तयार करून त्याच्यावर २५ कार्यकर्त्यांची जबाबदारी सोपवा. प्रभागात ५० कार्यकर्ते तयार करा. त्यातून २० हजार कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल. राज्यातील प्रत्येक महानगरपालिकांमध्ये अशी यंत्रणा तयार केली तर निवडणूकीत पक्षाला फायदा निश्चित होणार आहे असेही अजित पवार म्हणाले.
माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवायची आणि त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे याचा वेगळा विचार सध्या सरकार करत असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आज अजित पवार यांनी आपल्या भाषणात वैद्यकीय सहाय्यता कक्ष सेल आणि वचनपूर्ती सेल या दोन सेलची घोषणा केली. वैद्यकीय सहाय्यता सेल हा उपमुख्यमंत्री कार्यालयातून राबवला जाईल तर वचनपूर्ती हा सेल उपमुख्यमंत्री कार्यालय आणि प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार आहे असेही पवार यांनी सांगितले.
पक्षाबद्दल एक नवीन विश्वास आणि आस्था निर्माण करण्याचे काम करा
पक्षाची मर्यादा ओळखून कार्यकर्त्यांनी श्रध्दा आणि सबुरीने पक्ष वाढीसाठी काम करायचे आहे. पक्षाबद्दल एक नवीन विश्वास आणि आस्था निर्माण करण्याचे काम करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्या
पक्षाला विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्यायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले.
आता संघर्षाचे दिवस संपले असून आपल्याला उद्याच्या २५ वर्षाचा पक्षाचा भक्कम पाया या शिबिरातून घेऊन जायचा आहे.इथला विचार चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचवला जाईल आणि वेगवेगळे कार्यक्रम दिले जातील असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
या शिबीरात आजच्या दुसर्या दिवशी सकाळी संविधानावर आधारीत चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर ‘शिव – शाहू – फुले – आंबेडकर पुरोगामी विचारधारा’ या विषयावर लहूजी कानडे यांनी विचार व्यक्त केले. ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, नंतर अन्न – नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनीही आपले विचार मांडले.
या शिबीराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, खासदार सुनेत्रा पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आदींसह पक्षाचे विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
ML/ML/PGB 19 Jan 2025