विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत बिघाडी

 विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत बिघाडी

मुंबई दि २९ : राज्य विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाने उद्धव ठाकरे यांची उमेदवारी जाहीर न केल्यामुळे काँग्रेस कमालीची नाराज झाली असून त्यांनी आपला स्वतंत्र उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली असल्याचे चित्र उभे राहिले आहे.

महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिल्यास आपला त्याला पाठिंबा असेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्यक्ष ठाकरे यांची भेट घेऊन स्पष्ट केले होते. त्यासोबतच आगामी राज्यसभा निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने देखील उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला होता. यामुळे उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती .

मात्र आज शिवसेना उबाठा पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करत उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे स्पष्ट करत उद्धव ठाकरे लढणार नाहीत असे प्रसार माध्यमांना सांगितले, यामुळे काँग्रेस पक्षातून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

काँग्रेस पक्षाने आपला स्वतंत्र उमेदवार देण्याचे जाहीर केले असून दानवे यांची उमेदवारी आपणास मान्य नसल्याचे म्हटले आहे. विद्यमान विधानसभा सदस्यांची संख्या पाहता महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षाचे वीस आमदार असून त्या खालोखाल काँग्रेसचे 16 आमदार आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दहा आमदार आहेत. त्यामुळे संख्येने दोन क्रमांकाच्या असणाऱ्या आपल्या पक्षाला डावले जात असल्याची भावना काँग्रेस पक्षात आहे. यामुळेच अंबादास दानवे यांना पाठिंबा न देता आपला स्वतंत्र उमेदवार लढवावा अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे बिघाडी झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीने एका जागी विजय मिळवणे शक्य असताना प्रत्यक्षात जर दोन उमेदवार दिले तर त्यांचे दोन्ही उमेदवार पराभूत होण्याची शक्यता असून याचा फायदा महायुती घेणार असे स्पष्टपणे दिसून येत आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *