ड्रग्स माफियांवर कारवाईत सरकार अपयशी; बुलडोझर चालवा – खा. संजय दिना पाटील यांचा संताप
मुंबई, दि. २९– शहरात वाढत चाललेल्या ड्रग्स माफियांच्या कारवायांवर नियंत्रण आणण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची घणाघाती टीका करत खासदार संजय दिना पाटील यांनी “ड्रग्स माफियांच्या घरांवर बुलडोझर चालवून कठोर कारवाई करा, अशी जोरदार मागणी केली. वांद्रे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या विशेष बैठकीत त्यांनी सरकारच्या ढिसाळ कारभारावर कडक शब्दांत हल्लाबोल केला.
शिवाजीनगर, गोवंडी परिसरात ड्रग्स माफियांचा वाढता प्रभाव अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद करत त्यांनी या गुन्हेगारीमुळे खूनसारख्या गंभीर घटना घडत असल्याकडे लक्ष वेधले. “माफियांकडे स्वतःचे सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आहेत, लहान मुलांना गुन्हेगारीत ओढले जात आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी एकत्रित आणि कठोर मोहीम राबवणे गरजेचे आहे, असे त्यांनी ठणकावले. यावेळी त्यांनी बेस्ट बस अपघातांच्या वाढत्या घटनांवरही सरकारला जबाबदार धरले. चालकांना पुरेसे प्रशिक्षण, विश्रांती आणि सुविधा न दिल्यामुळे अपघात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मानसिक आणि शारीरिक तणावाखाली काम करणाऱ्या चालकांकडून सुरक्षित सेवा अपेक्षित ठेवणे ही प्रशासनाची मोठी चूक आहे, असा आरोप त्यांनी केला.पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी भांडुप, मुलुंड आणि घाटकोपर भागातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या भागातच नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागते, ही प्रशासनाची मोठी विडंबना आहे, अशी बोचरी टीका करत स्थानिक जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
भांडुप येथे महिला उद्योग भवनासाठी मंजूर झालेला निधी दोनदा परत गेल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. यावेळी निधी परत जाऊ नये, अडचणी तातडीने दूर करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली. डम्पिंग ग्राऊंडच्या खोदकामातून बाहेर पडणारे केमिकल्स आणि गॅसमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले. लोकांच्या आरोग्याशी खेळ करून विकासाच्या नावाखाली कामे केली जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर प्रस्तावित गोल्फ कोर्सलाही त्यांनी तीव्र विरोध दर्शवत लोकांना गोल्फ नव्हे, तर रुग्णालये आणि शिक्षण सुविधा हव्यात, अशी भूमिका मांडली.
पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांकडे लक्ष वेधत त्यांनी ईशान्य मुंबईतील डोंगराळ भागात तातडीने संरक्षण भिंती उभारण्याची मागणी केली. दरवर्षी जीवितहानी होत असूनही प्रशासन झोपलेले आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच भांडुप पश्चिममधील अरुंद रस्ते, रेल्वे परिसरातील अनधिकृत स्टॉल, पीएपी घरांमधील स्थानिकांवरील अन्याय आणि गोवंडीतील शासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. कामचुकार अधिकारी आणि निष्क्रिय सरकारमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत, असे ते म्हणाले.एकूणच, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील यांनी ईशान्य मुंबईतील नागरिकांचे विविध प्रश्न ठामपणे मांडत सरकारच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विकासकामे केवळ कागदावर नकोत, ती प्रत्यक्षात दिसली पाहिजेत, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर, जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका, अग्निशमन दल आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.ML/ML/MS