१६ एप्रिलपासून शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन
मुंबई, दि. ४ : राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न, वेतनातील विलंब अशा अनेक मागण्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी विविध शिक्षक संघटना १६ एप्रिलपासून राज्यभर तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर वेतनाच्या प्रश्नाने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून ‘शिक्षक भारती’ संघटनेने १७ एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. अतिरिक्त शिक्षक ठरवण्यासाठी वापरले जाणारे निकष तर्कहीन असून, त्यातून शिक्षकांचे वेतन रोखले जात आहे. हा प्रकार तातडीने थांबवून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
गेल्या दोन ते सहा वर्षांपासून शिक्षकांची विविध देयके थकित असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी, निधी उपलब्ध असतानाही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कोट्यवधींचा निधी व्यपगत होत आहे. १५ एप्रिलपासून थकित देयकांची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी होत असून निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना सक्तीने ‘बीएलओ’ म्हणून जुंपले जात असल्याबाबत आक्षेप नोंदवत, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून शिक्षकांवर अशैक्षणिक जबाबदाऱ्या लादल्या जात आहेत. हे तातडीने थांबवावे, असे शिक्षक संघटनांनी नमूद केले आहे.
SL/ML/SL