रायगडावर प्रि-वेडींग फोटोशूट – शिवप्रेमींमध्ये संताप

 रायगडावर प्रि-वेडींग फोटोशूट – शिवप्रेमींमध्ये संताप

मुंबई, दि. १४ : सध्या राज्यभर प्रि-वेडींग फोटोशूटचा सुळसुळाट सुरु आहे. राज्यातील प्राचीन मंदिरे आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणे तासंतास फोटोशूट करणारे कॅमेरामन आणि जोडपी यांनी व्यापून गेली आहेत. अनेकदा यामुळे पर्यंटकांनाही सदर ठिकाणी मोकळेपणाने फिरता येत नाही. आता तर या राजराजेश्वर रायगडावर प्रि-वेडिंग फोटोशूट झाल्याच्या प्रकार समोर आल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप पसरला आहे. प्रकरणाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) खासदार सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या रायगडावर व्यावसायिक किंवा खासगी चित्रीकरणासाठी कडक नियम आहेत. असे असतानाही गडावरील महत्त्वाच्या ठिकाणी एका जोडप्याने प्री-वेडिंग शूट केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गडाचे पावित्र्य जपण्याऐवजी तिथे अशा प्रकारचे वैयक्तिक सोहळे साजरे केल्याने गडाच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी या घटनेवर संताप व्यक्त करताना म्हटले आहे की,”स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे प्री-वेडिंग व्हिडीओ शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही अत्यंत निंदनीय बाब असून, या ऐतिहासिक वारशाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी ही सर्व भारतीय नागरिकांची आहे. विशेषतः छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि मोठे झालेल्या कुणाकडूनही अशा प्रकारची आगळीक होणे अपेक्षित नाही. यावर कठोर कारवाई केली जाईल. पुरातत्त्व खात्यालाही या संदर्भात सूचना देण्यात येतील. असे प्रकार यापुढे टाळावेत ही सर्व नागरिकांना विनंती आहे”.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *