तळीरामांच्या खिशाला लागणार कात्री

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सणासुदीच्या निमित्ताने सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणि सवलतींची घोषणा करत आहे. मात्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने व्हॅटमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळं तळीरामांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गोवा, चंदीगड आणि हरियाणाच्या तुलनेत महाराष्ट्रात दारू महाग मिळणार आहे.मद्यावरील व्हॅटचा दर वाढवण्याचा निर्णय उत्पादन शूल्क विभागाकडून घेण्यात आला आहे. परिणामी दारू, वाईन आणि बिअरचे दर वाढणार आहे.
परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावर सरकारने पाच टक्क्यांनी अतिरिक्त व्हॅट आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता क्लब, कॅफे किंवा बारमध्ये जावून दारू रिचवण्याचा प्लॅन करणाऱ्या तळीरामांना आणखी खिसा रिकामा करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच मद्याच्या दरात किंचित वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पाच टक्के व्हॅट वाढवण्यात आल्याने मद्याचे दर वाढणार आहे.
सरकारच्या नव्या निर्णयामुळं रेस्टॉरन्ट, बार, क्लब आणि कॅफेमधील मद्याचे दर वाढणार आहे. त्यामुळं तळीरामांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. पर्यटनासह महसूल वाढीसाठी देशातील अनेक राज्यांमध्ये स्पर्धा सुरू असताना राज्य सरकारने व्हॅट वाढवण्याच्या निर्णयावर बारचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय दिवाळीसह अनेक सणं काही दिवसांवर येवून ठेपलेली आहे. याशिवाय मद्यखरेदीसाठी लोकांना जास्त पैसे द्यावे लागणार असल्याने सरकारच्या महसूलात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
SL/KA/SL
21 Oct. 2023