राष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान आणि मूल्यांचा पाया रचण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोकळीक देण्याची गरज
-राधिका अघोर
देशाचे दुसरे राष्ट्रपती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस 5 सप्टेंबर देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हाडाचे शिक्षक, अभ्यासक असलेल्या डॉ. राधाकृष्णन यांचीच तशी इच्छा होती, कारण शिक्षकी व्यवसाय सर्वात महत्वाचा, सर्वात पवित्र कार्य आहे, असा त्यांना विश्वास होता. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर शिक्षक माणूस घडवत असतो, त्यामुळे जगातले सर्वोत्तम मेंदू आणि संवेदनशील, सर्जनशील मनं यांना शिक्षक बनवायला हवं. माणसांनी समाज बनतो, आणि माणूस चांगला घडला, तर आपोआप समाजही चांगला बनतो.
चांगला म्हणजे काय? आणि शिक्षकांनी तो कसा घडवायचा? तर भारताचे नागरिक म्हणून आपण ‘ कधी कधी ‘ देशभक्त आणि कधीच सुसंस्कृत जबाबदार व्यक्ती म्हणून वागत नसू, आणि असं वर्तन करणाऱ्या लोकांची संख्या अधिक असेल तर तो समाज चांगला समाज नाही, हे ओळखावे आणि पालक शिक्षकांसहित संपूर्ण ज्ञानव्यवस्थेत गंभीर त्रुटी आहेत, हे समजावे. केवळ मार्क मिळवणारे परीक्षार्थी विद्यार्थी हाकत रहाणारे पोटार्थी शिक्षक पाहिले तर ही त्रुटी नेमकी कुठे आहे, ते लक्षात येतं.
संपूर्ण व्यक्ती आणि त्यातून समष्टी घडवण्याची ताकद असलेल्या शिक्षकी पेशाला जे दुय्यम किंवा त्याच्याशी खालचे समजले जाते, तिथेच सगळी गडबड आहे. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, आणि शिक्षकांनी कोणत्याही इतर गोष्टींकडे लक्ष न देता, शिक्षण देण्यास महत्त्व द्यावं, हे आदर्श स्थितीच्या दृष्टीने बरोबर आहे. मात्र, सगळे जग व्यवहार बघत असताना शिक्षकांनी मात्र त्याचा विचार करू नये, असं म्हणणं अन्यायकारक आहे.
शिक्षकांना भारतात म्हणावा तसा मोबदला दिला जात नाही, सरकारी जागा कमी आहेत आणि खाजगी शाळांमध्ये अनेकदा शिक्षकांकडे कर्मचारी म्हणून पाहिलं जातं. अशावेळी,अपुरे वेतन आणि अध्यापनेतर कामे यामुळे शिक्षक मनापासून आपलं ज्ञानदानाचे कार्य करू शकत नाही. किंवा कधी कधी ईछा असूनही केलं जात नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या संपूर्ण जडणघडणीवर होतो.
आधी म्हटलं तसं, शिक्षक एक व्यक्तिमत्व घडवत असतात, एक सुजाण, सुसंस्कृत, संवेदनशील नागरिक घडवत असतात. यापेक्षा कुठली मोठी जबाबदारी असू शकते असं वाटत नाही. आज समाजात जे प्रश्न आपण बघतो आहोत, ते सगळेच आर्थिक विवंचनेतून, गरिबीतून निर्माण झाले आहेत, असं नाही. तर अनेक प्रश्न वर्तन, मूल्यांचा अभाव, माणसामधली पशू वृत्ती, माणसाला आलेली एक निबरता, बेफिकीर आत्मकेंद्री वृत्ती अशा सगळ्यामुळे निर्माण झालेले आहेत. यावर उत्तर मानसिकतेत बदल घडवणे हेच आहे. ज्याला आपण संस्कार म्हणतो. हे संस्कार देणारे पालक आणि शिक्षक स्वतः संस्कारक्षम, नीतीमूल्ये पाळणारे हवेत. दुर्दैवाने आज तशा शिक्षकांचं प्रमाण कमी झालं आहे आणि जे जीवापाड मेहनत घेऊन माणूस घडवू इच्छितात, त्यासाठी धडपड करतात, त्यांच्या समोर व्यवस्थेतल्या अडचणी आहेत.
संसाधने कमी आहेत, विद्यार्थ्यांमधे अत्यंत अनास्था आहे. शिक्षणाकडे केवळ अर्थार्जनाचे साधन म्हणून बघण्याची वृत्ती वाढली आहे.
गुगल सारख्या आयत्या सोयींमुळे ज्ञान मिळवण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी उरलेली नाही. मार्क मिळवणारे अभ्यासू विद्यार्थी केवळ परीक्षा, स्पर्धा अशा जीवघेण्या चक्रात एखाद्या यंत्रासारखे फिरत आहेत. खरं तर अडचणी खूप आहेत. पण त्यावरचा एक उपाय करता येऊ शकतो, तो म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही किमान प्राथमिक, माध्यमिक वर्गापर्यंत मोकळं सोडणं. शिक्षकांना सुविधा, उत्तम वेतन देणं आणि हा पाया घडवण्यासाठी पुरेसा वेळ, स्वातंत्र्य मिळेल असं वातावरण निर्माण करणं. आणि केवळ ज्ञान घेता येईल, अशी व्यवस्था, मुलांसाठी निर्माण करणं.
गुणांच्या पिंजऱ्यातून त्यांना मोकळं करत, ज्ञान मिळवण्यासाठी उद्युक्त करणं, त्यांचा मूल्याधिष्ठित पाया घडवून एक माणूस बनवण्यासाठी तयार करणं.
असं जर करता आलं, तर आज बदलापूर मधल्या शाळेत, किंवा बंगालच्या वैद्यकीय महाविद्यालयात झाल्या तशा अमानुष घटना आपल्याला टाळता येतील. शिक्षक चांगले असतील, तर विद्यार्थी आणि पर्यायानं चांगला समाज आपल्याला घडवता येईल.
हे अशक्य तर नाहीच; कठीणही नाही. अशा विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या देशभरातल्या शिक्षकांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवलं जातं, असे आणखी अनेक शिक्षक भविष्यात तयार होवोत अशाच शुभेच्छा !
प्रतिकूल परिस्थितीत आपली सर्जनशील आणि प्रयोगशील वृत्ती जागी ठेवत, प्रेमाने मुलांना घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! त्यांची अमिट छाप विद्यार्थ्यांच्या हृदयात अशीच कायम राहो !