सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांचा अपमान थांबवामुख्यालयात गेटवरच ‘नो एंट्री’.
मुंबई, दि १२: आयुष्यभर बेस्ट उपक्रम आणि मुंबईकरांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कुलाबा येथील बेस्ट मुख्यालयात थकबाकी, निवृत्तीवेतन किंवा कागदपत्रांच्या चौकशीसाठी आलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुरक्षारक्षकांकडून गेटवरच अडवले जाते. अनेकांना मुख्यालयात प्रवेशच दिला जात नसल्याने माजी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
“वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा असा अपमान होणे योग्य नाही. सेवानिवृत्तीनंतर त्यांची किंमत शून्य झाल्यासारखी वागणूक दिली जात आहे,” अशा शब्दांत नांदगावकर यांनी प्रशासनावर टीका केली.
दरम्यान, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत बसपास सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांना पत्र दिले आहे.
विश्वासराव यांनी पत्रात म्हटले आहे की, बेस्ट उपक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात मुंबईकरांना निष्ठेने सेवा दिली आहे. त्यांच्या दीर्घ योगदानाची दखल घेत सेवा निवृत्तीनंतर त्यांना सन्मानपूर्वक सुविधा देणे आवश्यक आहे. पूर्वी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध होती, मात्र ती बंद करण्यात आली. सध्या केवळ नाममात्र शुल्कात बसपास दिला जातो.
वाढती महागाई, मर्यादित निवृत्तीवेतन आणि आर्थिक अडचणी लक्षात घेता सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने मोफत बसपास सुविधा देण्यात यावी. ही सुविधा त्यांच्या सेवेला योग्य तो मान आणि सन्मान देणारी ठरेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.KK/ML/MS