NEET चा पेपर 15 लाखांना विकणाऱ्या तरुणाला अटक
नाशिक, दि. १२ : ३ मे रोजी देशभर घेण्यात आलेली UG NEET परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातील 22 लाख 29 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. नाशिकमधून NEET परीक्षेचा पहिला पेपर फुटला, येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेने 30 वर्षीय संशयित शुभम खैरनार याला अत्यंत नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या आहेत. ओळख लपवण्यासाठी आरोपीने चक्क टक्कल केले होते, मात्र नाशिक पोलिसांच्या नजरेतून तो वाचू शकला नाही.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, 1 मे रोजीच हा पेपर फुटला होता. शुभम खैरनारने 10 लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि ती पुढे 15 लाख रुपयांना विकल्याचा संशय आहे. या व्यवहारानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामवर लीक झाली.
NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमध्ये लीक झाली, तिथून ती हरियाणात पोहोचली. हरियाणात या पेपरचे 10 संच तयार करण्यात आले आणि त्यानंतर बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरपर्यंत ही साखळी पसरली. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले असून राजस्थानचा मनीष हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जात आहे.
राजस्थान सीबीआय आणि पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ने ही कारवाई करत शुभमला अटक केली. शुभम खैरनार हा मूळचा नांदगावचा रहिवासी असून तो नाशिकमध्ये BAMS च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तपासादरम्यान पोलिसांना त्याचे नाव मिळाले होते, मात्र पत्ता नव्हता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला. तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी रस्त्यातच सापळा रचला. सुरुवातीला नवीन ‘लूक’मुळे तो ओळखू आला नाही, मात्र पोलीस अंमलदारांनी त्याला शिताफीने ओळखले आणि अवघ्या एक तासात त्याला ताब्यात घेतले.
SL/ML/SL