भारताने निलंबित केली कॅनडीयन नागरिकांसाठीची व्हिसा सर्विस

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडात तणाव वाढत आहे. हे लक्षात घेऊन कॅनडातील भारताच्या व्हिसा अर्ज केंद्राने कॅनेडियन लोकांसाठी व्हिसा सेवा निलंबित केली आहे. याआधी मंगळवारी कॅनडाने आपल्या नागरिकांना भारताच्या काही भागात न जाण्याचा सल्ला दिला होता. बुधवारी भारतानेही असाच सल्ला जारी केला. यानंतर कॅनडाने रात्री उशिरा भारताचा सल्ला फेटाळला. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेबनेक यांनी ओटावा येथे मीडियाशी बोलताना सांगितले की, त्यांचा देश पूर्णपणे सुरक्षित आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक अॅडव्हायझरी जारी केली होती. ज्यामध्ये म्हटले होते – कॅनडात सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया पाहता तेथे राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.अलीकडच्या काळात, भारतीय मुत्सद्दी आणि कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाच्या विशिष्ट वर्गाला धमकावले जात असल्याचे दिसून आले आहे. भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणारे हेच लोक आहेत.अॅडव्हायझरीनुसार, कॅनडातील बिघडलेली सुरक्षा परिस्थिती पाहता तेथे उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय समुदाय आणि विद्यार्थी उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांच्या वेबसाइटवर तक्रारी नोंदवू शकतात.
काल खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना देश सोडण्याची धमकी दिली होती. यावर कॅनडाच्या हिंदूंनी जस्टिन ट्रुडो सरकारला पत्र लिहिले आहे. पत्रात पन्नूच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त करण्यात आली असून याला द्वेषपूर्ण गुन्हा घोषित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कॅनेडियन हिंदू संघटना ‘हिंदू फोरम कॅनडा’ने सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लेन यांना हे पत्र लिहिले आहे. हिंदू संघटनेने आपल्या पत्रात म्हटले आहे की, पन्नू यांनी त्यांचे आणि त्यांच्या खलिस्तानी सहकाऱ्यांचे मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. त्यांना त्यांच्या विचारधारेशी सहमत नसलेल्या लोकांना लक्ष्य करायचे आहे. कॅनडाच्या सरकारने याचा गांभीर्याने विचार करायला हवा.पन्नूचे हे विधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून घेतले जाणार का, असा सवालही या पत्रात करण्यात आला आहे.
दरम्यान दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची हत्या भारतानेच घडवून आणली असे कॅनडाने केलेला आरोप भारताने फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- कॅनडाचे सर्व आरोप हास्यास्पद आहेत. असेच आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधान मोदींवर केले होते आणि ते पूर्णपणे फेटाळले गेले.
असे बिनबुडाचे आरोप म्हणजे खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेकी यांच्यापासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना कॅनडात अभय देण्यात आले असून ते भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला धोका आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बुधवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचेही वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयशंकर यांनी पंतप्रधानांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.