अन्नसुरक्षितता- पूर्णब्रह्माची सामूहिक साधना !

चांगले आणि सकस अन्न मिळणे, हा प्रत्येक मानवी अस्तित्वाचा मूलभूत अधिकार आहे. शाकाहार, मांसाहार, मिश्राहार, फलाहार किंवा कोणताही आहार असो, पारंपरिक असो की आधुनिक, स्थानिक असो की परदेशी – मनुष्यदेहाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक बांधणीसाठी अन्नच महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करता, अन्नकोश आणि अन्नमय प्राण यांना प्राथमिक पातळीवर महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे मानवाच्या आणि समाजाच्या शांतीसाठी, सुरक्षित अन्नाची सार्वत्रिक, सार्वकालीन तसेच पुरेशी उपलब्धता ही पायाभूत बाब आहे. त्या उद्देशानेच संयुक्त राष्ट्रांच्या फाओ (FAO)- अन्न तथा कृषी संघटनेची स्थापना करण्यात आली. ही संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे ठेवलेल्या प्रस्तावाचा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्वीकार केला आणि २०१९ पासून ७ जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षितता दिवस म्हणून मान्यता पावला.
या संघटनांचा हा एकत्रित प्रकल्प असल्याने, यात विविध मुद्द्यांना एकाचवेळी हात घातला जातो. परिणामी, जागतिक स्तरावर अन्न सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्य, दोन्हींचा सांभाळ होण्यास मदत होते.
या अनुषंगाने चर्चा करण्यापूर्वी, दोन संज्ञा सांगणे गरजेचे आहे. अन्नसुरक्षा (food security) आणि अन्नसुरक्षितता (food safety) हे दोन वेगळे मुद्दे आहेत आणि ते वेगवेगळे विचारात घेतले पाहिजेत. प्रत्येकाला पोटभर सकस पोषक अन्न उपलब्ध असणे/ आवाक्यात असणे/ परवडणे याचा समावेश अन्नसुरक्षेत होतो. तर ते अन्न स्वच्छ, शुद्ध, अदूषित असणे, पोषक असणे याचा समावेश अन्नसुरक्षिततेत होतो. त्यामुळे एका अर्थी, अन्नाच्या सुरक्षेत अन्नाची सुरक्षितता अनुस्यूतच आहे. अन्नसुरक्षा आणि आरोग्यसुरक्षा यांसाठी अन्नाच्या सुरक्षिततेचे महत्त्व अतुल्य आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी जगातील १० टक्के लोक दूषित अन्नामुळे आजारी पडतात. दूषित अन्नाच्या सेवनामुळे २०० पेक्षा अधिक आजार होऊ शकतात. अन्नाच्या माध्यमातून येणाऱ्या आजारपणापैकी ४० टक्के आजारपणे ५ वर्षांखालील मुलांना सोसावी लागतात. या पार्श्वभूमीवर, यावर्षीच्या अन्न सुरक्षितता दिनाची मध्यवर्ती संकल्पना तपासली पाहिजे. ‘अन्न सुरक्षितता-: अनपेक्षित घटनांसाठी तयार राहा’ अशी मध्यवर्ती संकल्पना घेण्यामागे, या आजारांकडे लक्ष वेधण्याचा हेतू आहे.
अन्न सुरक्षित ठेवणे ही अनेक पायऱ्यांची आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असून, ती अन्नघटकांच्या उत्पादनाच्या ठिकाणी (शेतात/ मासेमारीच्या तळ्यात/ कुक्कुटपालन केंद्रात वगैरे) सुरु होते आणि थेट उपभोक्त्यापर्यंत येऊन थांबते. या प्रत्येक पायरीवर स्वच्छता, शुद्धता, ताजेपणा, अन्नदूषके मिसळू न देण्याची काळजी आदी गोष्टींचे काटेकोर पालन झाल्याखेरीज सुरक्षित अन्न पोटापर्यंत पोहोचू शकत नाही. अन्नसुरक्षिततेला चार प्रकारचे धोके पोहोचू शकतात- जैविक, रासायनिक, भौतिक आणि ऍलर्जिक. अपकारक सूक्ष्मजीव किंवा नकोशी रसायने मिसळली जाणे किंवा शिळेपणामुळे वगैरे ती अन्नातच उत्पन्न होणे, कागद/काच/कुसळ/माती वगैरे भौतिक कचरा अन्नात मिसळला जाणे- अशा कारणांनी अन्न असुरक्षित बनते. या गोष्टी टाळण्यासाठी घरगुती पातळीवर अगदी सहज करण्यासारखे उपाय म्हणजे- गरम-ताजे अन्न खाणे, उरलेले अन्न झाकून ठेवणे, त्याचे तापमान सांभाळणे, कच्चे तसेच शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवणे, हातांची तथा भांड्यांची स्वच्छता इत्यादी.
आजच्या दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात फाओ चे महासंचालक म्हणतात- ‘व्यक्ती जे अन्न सेवन करत असेल, ते सुरक्षित असेल तरच ती सुदृढ आणि उत्पादनक्षम राहू शकते. अशी अन्नसुरक्षितता हे मूल्यसाखळीतील प्रत्येक घटकाचे दायित्व आहे. गेल्या काही वर्षांत ओढवलेल्या संकटांमुळे, अन्नाची उपलब्धता आणि परवडण्याजोग्या किंमतीत उपलब्धता- यांत फार आह्वाने उभी राहिली आहेत. त्यामुळे, वंचितांसह सर्वाना सुरक्षित आणि पोषक अन्न मिळावे याची काळजी सर्वानी मिळून घेतली पाहिजे. अन्नाच्या माध्यमातून पसरणाऱ्या विकारांना प्रतिबंध केला पाहिजे. आणि अनपेक्षित आह्वानांशी दोन हात करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे.’
हवामानबदलामुळे अनेक वर्षांपासून रासायनिक खते/कीडनाशके यांचे प्रमाण वाढत गेले आहे, हे मान्य केले पाहिजे. त्यामुळे होणारा नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास लक्षात घेऊन सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. पण याने अन्नसुरक्षिततेचा मुद्दा सोडवताना, अन्नसुरक्षा धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सरतेशेवटी, यातील समतोल साधण्यासाठी, गरज आणि चंगळ यांतील सीमा ओळखणे अगत्याचे आहे, हेच खरे! शेती, खत उद्योग, मासेमारी, पशुपालन, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन यांसह दुग्धव्यवसाय, अन्नप्रक्रिया उद्योग, आणि या सूचीत न आलेले इतर असंख्य उद्योग-व्यवसाय सुरक्षित तसेच काटेकोर झाल्याशिवाय अन्न सुरक्षितता आणि हे व्यवसाय संतुलित / शाश्वत झाल्याशिवाय, खरी अन्नसुरक्षा संपादन करता येणार नाही. यासाठी देशांनीही एकमेकांशी स्पर्धा न करता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. एरव्ही ब्रह्मज्ञान हा जरी वैयक्तिक साधनेचा विषय असला तरी, या ‘पूर्णब्रह्माची’ साधना मात्र, अशी सामूहिक पद्धतीनेच व्हायला हवी !
—-जाई वैशंपायन.