पालकमंत्रीपदावरून मतभेद उफाळले, एकनाथ शिंदे दरे गावी रवाना….

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीमध्ये असंतोष उफाळून आला आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार गटातील आदिती तटकरे यांच्याकडे गेल्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध दर्शविला आहे. यावरून निर्माण झालेल्या वादात शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे नाराज होऊन सातारा येथील दरे या आपल्या मूळगावी निघून गेले आहेत असे समजते. त्यामुळे महायुती सरकारमधील नाराजी नाट्य समोर आले आहे.
महायुतीमध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आदिती तटकरे यांना तर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजप नेते गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. मात्र,आदिती तटकरे यांच्या नावाला शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावर मंत्री भरत गोगावले यांचाही दावा होता. मात्र, आदिती तटकरे यांचे नाव जाहीर होताच गोगावले यांच्यासह शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील टोकाचा विरोध दर्शविला आहे.
तिकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागल्यानंतर शिवसेना नेते दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली होती. या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या वादामुळे महायुतीमधील मतभेद उफाळून आले.
त्यानंतर राज्य सरकारने एका शासन निर्णयाद्वारे रायगड तसेच नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली. त्यामुळे नाराज झालेले एकनाथ शिंदे अचानक मुंबई सोडून आपल्या दरे या मूळगावी निघून गेले अशी चर्चा आहे. शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे हेलिकॉप्टरने दरे गावला रवाना झाले आहेत. भाजपच्या या दोन नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यातून महायुतीमधील वाद संपुष्टात येईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदेंना संपवून
नवा ‘उदय’ – विजय वडेट्टीवार
दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीमधील वादावर टीका केली आहे. नाराजी दाखवून काहीतरी आपल्या पदरात पाडून घेण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या राजकारणात शिंदे यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. भाजपला त्यांची गरज नसून त्यांनी बाजूला व्हावे, अशी स्थिती निर्माण केली जात आहे.
उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना आणले. आता शिंदे यांना संपवून नवीन उदय पुढे येईल, असा टोला वडेट्टीवार यांनी हाणला आहे. तो उदय कुठला असेल, त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ML/ML/PGB 20 Jan 2025