राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्यांसाठी पाच किलो धान्य

 राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्यांसाठी पाच किलो धान्य

मुंबई दि २५ : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा राज्यातील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्यात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ५ कोटी ७९ लाख ३४ हजार ७०२ लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य तर १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील २१ लाख ६० हजार ६८२ शेतकऱ्यांना दरमहा १७० रूपये दिले जातात. दोन्ही योजनांचा लाभ न मिळणाऱ्या शेतकरी कुटुंबांचा विचार करून त्यांनाही दर महिन्याला माणशी पाच किलो अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे धान्य पुढील तीन महिन्यांसाठी वितरीत करण्यात येईल. तसेच त्यापुढील काळासाठी आढावा घेऊन योजना सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचा लाभ तसेच एपीएल-डिबीटी योजनेचा रोख लाभ मिळत नसलेल्या एकूण ३३ जिल्ह्यातील ४२,३०,७८३ शेतकऱ्यांना दरमहिन्याला माणशी ५ किलो (३) किलो तांदूळ + २ किलो गहू) या प्रमाणात ३ महिन्यांकरिता मोफत धान्य देण्यात येणार आहे.

आधार सीडिंग पूर्ण झालेल्या शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य वाटप करण्यात येणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण करून घेतल्यानंतरच त्यांना बायोमेट्रिक पडताळणीद्वारे हे धान्य देण्यात येईल. या मोफत धान्य वितरणाकरिता आवश्यक असणारे अतिरिक्त नियतन केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून मागणी करण्यास मान्यता देण्यात आली.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *