महाराष्ट्र बँक घोटाळ्यात तर अजित पवार नाहीच

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँकेच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणे हाताळणाऱ्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे, ज्यामध्ये यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली होती. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांची नावे ईडीने आरोपपत्रातून वगळण्यात आली आहे. तसेच एमएससी बँक घोटाळ्याची चौकशी करताना समोर आलेल्या काही कंपन्यांची नावे मात्र कायम ठेवण्यात आली आहेत.
जुलै 2021 मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले होते की, त्यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत, प्लांट आणि यंत्रसामग्री यांसारखी 65 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची (2010 मध्ये खरेदीची किंमत) मालमत्ता जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी (MSCB) संबंधित प्रकरणामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (PMLA), 2002 च्या संबंधित तरतुदींनुसार गुन्ह्यात ही कारवाई केली गेली होती.
ही मालमत्ता गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर होती आणि जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला भाडेतत्त्वावर दिली होती. ईडीला त्यांच्या चौकशीत आढळले की स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड – महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित कंपनी आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याचे बहुतांश शेअर्स सुनेत्रा यांच्याकडे होते.
सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखान्याची जप्ती ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात ईडीने केलेली पहिली कारवाई होती, ज्यात बँकेने 25,000 कोटी रुपयांचे कर्ज फसव्या पद्धतीने वाटप केल्याचे सांगण्यात आले.
SL/KA/SL
12 April 2023