ब्युटी प्रोडक्ट्स खाणाऱ्या तैवानी इन्फ्लुएन्सरचा मृत्यू

जगभरातील सौंदर्य उत्पादनांचे अनोख्या पद्धतीने रिव्यू करणाऱ्या तैवानी इन्फ्लुएन्सर दुआवा शुईशुईचे अचानक निधन झाले. ही इन्फ्लुएन्सर रिव्यू करताना ब्युटी प्रोडक्ट्स खात देखील असे. सोशल मीडियावर शुईशुई यांना गुआवा ब्युटी म्हणून ओळखले जात असे. शुईशुई फक्त २४ वर्षांची होती. काही आजारामुळे तिच्या अचानक मृत्यूची बातमी समोर आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. इन्फ्लुएन्सर व्यक्तीच्या मृत्यूची माहिती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून देण्यात आली.
इन्फ्लुएन्सर गुआवा शुईशुईचे अचानक आजारपणामुळे निधन झाले. तिच्याबद्दल फारशी माहिती देण्यात आलेली नाही. गुआवा शुईशुई तिच्या अनोख्या व्हिडिओ स्टाईलसाठी ओळखली जात होती. अनेक व्हिडिओंमध्ये, चेहऱ्यावर मेकअप उत्पादने लावल्यानंतर ती ते खात असे आणि त्यांची चव देखील सांगत असे. एका लोकप्रिय व्हिडिओमध्ये, शुईगुईने जेली ब्लश लावला आणि नंतर चमच्याने तो काढून खाल्ला. या व्हिडिओमध्ये, तिने असा इशारा देखील दिला की हे उत्पादन खाण्यासाठी नाही आणि ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना व्हिडिओ पाहण्यास मनाई आहे.