‘नागरी संरक्षण मॉक ड्रिल’ मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी, तरुणांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे : अभाविप

मुंबई, दि.6
दि. ०७ मे २०२५ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे देशभरात ‘नागरी संरक्षण मॉक ड्रिलचे’ आयोजन करण्यात आले आहे. काश्मीर मधील पहलगाम येथे अलिकडेच हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सायबर हल्ले आणि शत्रुत्वाच्या कारवायांसह सीमेपलीकडून वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, ही देशव्यापी मॉक ड्रिल नागरी आणि संस्थात्मक यंत्रणांची तयारी मजबूत करण्याच्या दिशेने एक अत्यावश्यक पाऊल आहे. गृहमंत्रालयाच्या या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रांत स्वागत करते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा असा विश्वास आहे, की राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ आपल्या सैन्याची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची, विशेषतः तरुणांची सामाजिक जबाबदारी आहे. देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे सामाजिक जागरूकतेचे केंद्र बनावी यादृष्टीने सर्व विद्यार्थी, युवक आणि शैक्षणिक संस्थांना या मॉक ड्रिलमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन गांभीर्याने प्रशिक्षण घेण्याचे आणि सतर्क, शिस्तबद्ध व सुरक्षित भारत निर्माण करण्यात आपली भूमिका बजावण्याचे आवाहन अभाविप करते. या मॉक ड्रिलमध्ये कोंकण प्रांतातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच उत्तर गोवा व दक्षिण गोवा या जिल्ह्यांचा समावेश आहे. देशातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तयार रहाण्यासाठी आणि दहशतवादी घटनांना योग्य उत्तर देण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या भूमिके बद्दल सतर्क राहिले पाहिजे, असे मत अभाविप कोंकण प्रांत मंत्री राहुल राजोरिआ यांनी व्यक्त केले.