‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ २५ व्या प्रयोगासाठी सज्ज

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ लवकरच आपल्या २५ व्या प्रयोगासाठी सज्ज होत आहे.
मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात ‘संगीत मानापमान’ हे नाटक गंधर्व नाटक मंडळी आणि ललित कलादर्श या दोन प्रतिष्ठित नाट्यसंस्थांमध्ये सादर होत असे. या दोन्ही संस्थांचे मालक– बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन एक ऐतिहासिक प्रयोग सादर केला, जो पुढे ‘संयुक्त मानापमान’ या नावाने अजरामर झाला. ही ऐतिहासिक घटना आणि त्यामागील कथा प्रेक्षकांसमोर उलगडणारे ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नाटक प्रेक्षकांना एका वेगळ्याच जादुई रंगभूमीच्या प्रवासाला घेऊन जाणार आहे. गोष्ट संयुक्त मानापमानाची नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग २ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा. यशवंत नाट्यमंदिर , माटुंगा येथे होणार आहे.
‘संगीत मानापमान’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची तिसरी घंटा मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी दिली होती. याच परंपरेनुसार, ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ नाटकाच्या तिसऱ्या घंटेसाठी वंदना गुप्ते, सुप्रिया पिळगांवकर, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये आणि अशा अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. आतापर्यंत ४८ मान्यवरांनी ही परंपरा पुढे नेली असून, २५ व्या प्रयोगासाठी कोण तिसरी घंटा वाजवणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!