जागतिक डेटा संरक्षण दिन : आपल्या डेटावर आपलेच नियंत्रण

 जागतिक डेटा संरक्षण दिन : आपल्या डेटावर आपलेच नियंत्रण

राधिका अघोर

यंदाच्या डेटा संरक्षण दिनाची संकल्पना आहे – ‘ आपल्या डेटावर आपलेच नियंत्रण ‘
माणसाची साधन संपत्ती जसजशी वाढत जाते तसतसे त्याच्या संरक्षणाची व्यवस्था करणेही भाग होऊन जाते. डेटा म्हणजेच डिजिटल स्वरूपातली माहिती/ आकडेवारी ही आजची खाजगी संपत्तीच आहे. व्यक्ती म्हणून आपली, आपल्या कुटुंबाची गोपनीयता जपण्यासाठी आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगारी, डेटा चोरी हा आज जागतिक पातळीवर चिंतेचा विषय झाला आहे. म्हणूनच त्याच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करण्यासाठी 28 जानेवारी हा दिवस डेटा संरक्षण दिन म्हणून (data protection day) पाळला जातो.

इंटरनेट हा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. आबालवृद्ध पासून प्रत्येक वयोगटातले लोक इंटरनेटचा सहज आणि वारंवार वापर करत असतात. आपली कामे त्यामुळे सुलभ झाली आहेत. मात्र हे होतांना आपली सगळी अत्यंत महत्वाची माहिती आपण इंटरनेट नावाच्या जाळ्यात देत असतो, आणि अत्यंत निष्काळजीपणे देत असतो. सोशल मीडिया हा आणखी एक लोकप्रिय प्रकार झाला आहे. त्यावरही आपण स्वतः हून आपली माहिती भरत असतो. मात्र ही माहिती सुरक्षित आहे का? याचा आपण विचार करत नाही. आपला वैयक्तिक किंवा मग ऑफिशियल डेटा हॅक करून त्याचा गैरवापर करणे सहज शक्य आहे. अशी अनेक प्रकरणे आपण सायबर गुन्हेगारीत बघतो. आपल्याला दिसणाऱ्या वेब जाळ्याच्या पलीकडे एक ब्लॅक वेब आहे. त्यातून ही सगळी गुन्हेगारी होत असते. हे एक मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे. आणि सर्वच सार्वभौम देश, अर्थव्यवस्थेसाठी ते एक मोठे आव्हान ठरले आहे.

28 जानेवारी 1981 रोजी युरोपीय परिषदेने डेटा संरक्षणावरील पहिला आंतरराष्ट्रीय करार, कन्व्हेन्शन 108 वर स्वाक्षरी केली, त्यामुळे हा दिवस डेटा संरक्षण दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. डेटा संरक्षण आणि ऑनलाइन गोपनीयतेसह डिजिटल अधिकारांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावर जोर देणे, आजच्या डिजिटल युगात डेटा संरक्षणाची आव्हाने आणि संधी यांची माहिती देणे, अशा स्वरूपाची जनजागृती केली जाते.

भारतात, केंद्र सरकारने डेटा संरक्षणाबद्दल महत्वाचे पाऊल उचलत डेटा संरक्षण विधेयक आणले आहे. डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक ह्या प्रस्तावित कायद्यात, कोणाच्याही वैयक्तिक डेटावर केवळ व्यक्तीच्या संमतीने प्रक्रिया केली जाऊ शकेल, ( यात राष्ट्रीय सुरक्षा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या हेतूंचा अपवाद केला आहे), गोपनीयतेच्या तरतुदींचे पालन न केल्यास दंडाची तरतूद, डेटा संरक्षण मंडळाची स्थापना अशा तरतुदी आहेत. काही सुधारणा करत हे विधेयक संमत झाल्यास, डेटा संरक्षणाच्या दृष्टीने ते महत्वाचे ठरू शकेल.

मात्र आपण स्वतः ही आपल्या डेटा ची काळजी घ्यायलाच हवी. आपले पासवर्ड वारंवार बदलणे, ते कोणालाही न सांगणे, पासवर्ड सोपे न ठेवणे, कोणत्याही डिव्हाईस वरुन आपली बँकिंग किंवा इतर संवेदनशील कामे न करणे. मोबाईल किंवा लॅपटॉप कोणालाही हाताळू न देणे अशी अनेक कुलुपे लावून आपण आपला डेटा सुरक्षित ठेवू शकतो.

कुठल्याही मेसेज किंवा फोन वरच्या अनोळखी मेसेजेला प्रतिसाद ना देणे, हे पथ्य पाळले पाहिजे. एकवेळ प्रतिसाद दिला नाही तर नुकसान कमी होईल, पण फसवणूक नक्की टाळता येईल.

डेटा आपली संपत्ती आहे,आपणच त्याचं संरक्षण करायला हवं.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *