प्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर!

मुंबई दि.23 (एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून “घर घर संविधान” हा उपक्रम सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यात राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत प्रजाकसत्ताक दिनी संविधानाचा जागर होणार आहे. मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अशी माहिती समाज कल्याण विभाग मुंबई प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2025 संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भारतीय संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम व संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व आस्थापनामध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्यै शालेय, महाविद्यालय विद्यार्थी, तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावित यासाठी मुंबई विभागातील प्राथमिक, माध्यमिक सर्व प्रकारचे व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतीगृहे, निवासी शाळा, अशा सर्व ठिकाणी “घर घर संविधान” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर 2024 (संविधान दिवस) पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बाळासाहेब सोळंकी यांनी दिली.