या कालावधीत होणार अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

छ.संभाजीनगर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली आहे. 15 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या दरम्यान हा महोत्सव पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. डेलीहंट डिजीटल पार्टनर आहेत. सॉलीटेअर टॉवर्स हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अॅकॅडमीक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम 90.8 हे रेडिओ पार्टनर आहेत.
चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत आणि युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला आणि तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त आणि समृद्ध व्हाव्यात या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला जातो. यामुळे मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा हेतूही साध्य होतो.
छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे. मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.
SL/ML/ SL
5 Jan. 2025