कोकणातील या रुग्णालयात मेंदूवरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

चिपळूण, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या शहरात येणे शक्य नसणाऱ्या सामान्य कोकणवासियांसाठी चिपळूण जवळील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाचा मोठा आधार आहे. येथील निष्णात सर्जन्सनी आता एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करत लोकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. मेंदूतील ट्यूमर काढण्यात वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला मोठे यश आलं आहे. यामुळे एका १२ वर्षीय मुलीला नवीन आयुष्य मिळालं आहे. आता कोकणातील रुग्णांना मुंबई – पुणे सारख्या मोठ्या शहरात जाऊन अवघड शस्त्रक्रिया आणि होणारा खर्च यांची काळजी करायची गरज नाही असा दिलासा मिळाला आहे.
१२ वर्षीय मृण्मयी हिला १५ दिवस उलट्या होणं, भूक ना लागणं, डोकंदुखी असा त्रास होत होता. त्यामुळे तेथील स्थानिक डॉक्टरांनी तिला सलाईन लावल्या. यामुळे तिचं वजन १० किलोने घटलं. त्यानंतर अगदी हताश होऊन कृश अवस्थेत तिला शेवटचा पर्याय म्हणून वालावलकर रुग्णालयात आणलं. न्यूरोसर्जन मृदुल भटजीवाले यांनी मुलीला तपासून मेंदूचा एम.आर.आय केला आणि त्यात मेंदूच्या पाण्याच्या नलिकांमध्ये एक गाठ आढळली. ज्याला एपिण्डिमोमा असे म्हणतात.
मृण्मयीवर झालेली ही जटिल मेंदूची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत बीकेएल वालावालकर रुग्णालयात विनामूल्य करण्यात आली. डॉ. भटजीवाले आणि सहकारी डॉ. श्रेया टिबडेवाल, डॉ. सुधांशू सतीश राणे शस्त्रचिकित्सक आणि भूलतज्ञ डॉ. लीना ठाकूर आणि त्यांची टीम डॉ. अस्मिता, डॉ. सलोनी यांनी जबाबदारी उचलली.
SL/ML/SL
4 Dec. 2024