राधानगरी धरणातून विसर्ग, ३६ बंधारे पाण्याखाली…
कोल्हापूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.12 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ३६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड , शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे तथा सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे , वालोली, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी आणि तारेवाडी, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर आणि माणगाव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड यासह 36 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 3.12 टीएमसी, तुळशी 1.48 टीएमसी, वारणा 13.85 टीएमसी, दूधगंगा 6.53 टीएमसी, कासारी 1.03 टीएमसी, कडवी 1.41 टीएमसी, कुंभी 0.97 टीएमसी, पाटगाव 1.90 टीएमसी, चिकोत्रा 0.52 टीएमसी, चित्री 0.79 टीएमसी, जंगमहट्टी 0.68 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 0.93 टीएमसी, सर्फनाला 0.15 टीएमसी आणि कोदे लघु प्रकल्प 0.15 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. जांबरे मध्यम प्रकल्प काल पहाटे 2 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 28 फूट, सुर्वे 25.2 फूट, रुई 55.2 फूट, इचलकरंजी 52.4 फूट, तेरवाड 43.3 फूट, शिरोळ 36.3 फूट, नृसिंहवाडी 33.6 फूट, राजापूर 22.8 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट आणि अंकली 12.7 फूट अशी आहे.
ML/ML/SL
7 July 2024