सई परांजपे घेऊन येत आहेत दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन नाटक

 सई परांजपे घेऊन येत आहेत दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन नाटक

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

प्रख्यात ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच कालावधीनंतर रसिकांच्या भेटीला एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. त्यांनीच लिहिलेल्या वयाची ऐंशी पार केलेल्या दाम्पत्याची कथा असलेले हे नाटक म्हणजे ‘ब्लॅक कॉमेडी. त्यामध्ये मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या ६ दशकांहून अधिक काळ लेखन, दिग्दर्शन आणि बालरंगभूमीसाठी विपुल कार्य करणाऱ्या ८५ वर्षे पार केलेल्या सई परांजपे यांचे हे नाटक पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

मुंबई दूरदर्शनच्या (डीडी-सह्याद्री) ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त दूरदर्शनच्या पहिल्या कार्यक्रम निर्मात्यांपैकी एक असलेल्या सई परांजपे यांचे ‘सय’ हे आत्मचरित्र आता १५ ऑक्टोबरपासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मालिका स्वरूपात २६ भागांमध्ये प्रसारित होत आहे. ही माहिती सई परांजपे यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यानिमित्ताने परांजपे यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधताना नाटकाचे दिग्दर्शन करत असल्याची घोषणा केली.

दिग्दर्शक म्हणून मला ओळखत असले तरी मी मूळची लेखक आहे. माझे बरेचसे लेखन अद्याप अप्रकाशित आहे. त्यामध्ये अनेक पटकथा आणि नाटकाचे लेखन आहे. त्यामुळे अद्याप प्रकाशात न आलेले लेखन हे नाट्यसंहितेच्या माध्यमातून रसिकांसमोर येत आहे. सध्या तरी ‘इवलेसे रोप‘ असे या नाटकाचे नाव ठेवले आहे. कदाचित ते बदलले जाईल. मी लिहिलेले नाटक मीच दिग्दर्शित करत आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कितीही काम केले तरी रंगभूमीची मजा काही औरच आहे, अशी भावना सई परांजपे यांनी व्यक्त केली.

SL/KA/SL

2 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *