आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नौदलाची ‘ओशन रिंग ऑफ योगा’

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज आंतरराष्ट्रीय योग दिनामित्त देश विदेशात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय नौदलाने साकारलेला उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला आहे. भारतीय नौदलाने १० देशांमध्ये युद्धनौका पाठवून ‘ओशन रिंग ऑफ योगा’ बनवली. याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बंदरांना भेटी देऊन वसुधैव कुटुंबकमचा संदेश जगाला देण्यात आला. यासाठी 3500 नौसैनिकांनी 19 जहाजांमध्ये सुमारे 35 हजार किमी अंतर पार केले.
युद्धनौका बांगलादेशातील चितगाव, इजिप्तमधील सफागा, इंडोनेशियातील जकार्ता, केनियातील मोम्बासा, मादागास्करमधील तोमासिना, ओमानमधील मस्कत, श्रीलंकेतील कोलंबो, थायलंडमधील फुकेत, मलेशियामधील मलाक्का आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दुबईमध्ये पोर्ट कॉल पर्यंत पोहोचल्या.येथून त्यांनी ‘ओशन रिंग ऑफ योगा’ची निर्मिती केली. आयएनएस किल्तान, चेन्नई, सुनैना, शिवालिक, त्रिशूल, तर्कश, सुमित्रा, ब्रह्मपुत्र यासारख्या अनेक जहाजांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
मोहिमेत सहभागी झालेल्या नौसेनिकांनी योगाचे दूत म्हणून नौदलाचे प्रतिनिधित्व केले. २४०० नौसैनिक ११ नौदलाच्या जहाजांमधून आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातील १० विदेशी बंदरांवर पोहोचले. याशिवाय विविध देशांच्या नौदलाच्या जहाजांवर चढून सुमारे नौदलाच्या १२०० जवानांनीदेखील ही रिंग बनवण्यात भाग घेतला.
SL/KA/SL
21 June 2023