या वर्षी देखील बॉक्स ऑफीसवर दाक्षिणात्य चित्रपटांची चलती
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2022 मध्ये पुष्पा, KGF, RRR अशा दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर प्रचंड कमाई करून बॉलिवूडला चांगलीच धडक दिली. यावर्षी देखील असेच काही तगडे दाक्षिणात्य चित्रपट पॅन इंडीयामध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. त्याच जोडीला बॉलिवूड देखील विविध चित्रपट घेऊन सज्ज झाला आहे.
यावर्षी ‘पीएस२’ हा मणिरत्नम यांचा चित्रपट संपूर्ण देशात रिलीज होणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बाहुबली फेम प्रभासचा ‘सालार’ चित्रपटही या वर्षी जून महिन्यात अनेक भाषांमध्ये रिलीज होत आहे. पुष्पाच्या यशानंतर चाहते ‘पुष्पा २’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा २ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होईल. सामंथा रुथचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपटही याच वर्षी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.
या दाक्षिणात्य चित्रपटांना टक्कर देण्यासाठी बॉलिबुड देखील विविध चित्रपट घेऊन येत आहे. प्रभास, सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘आदिपुरुष’ या वर्षी जानेवारीच्या अखेरीस रिलीज होणार आहे. दीपिका पदुकोण आणि प्रभासचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ देखील याच वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनही आहेत.
10 Jan. 2023