अफगाणिस्तानात शाळेजवळ भीषण स्फोट; ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

 अफगाणिस्तानात शाळेजवळ भीषण स्फोट; ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

कुनार, दि. २८ : अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील कुनार प्रांतातील असदाबाद जिल्ह्यातील अँडरसेर परिसरात एका माध्यमिक शाळेजवळ आज सकाळी सुमारे १० वाजता झालेल्या भीषण स्फोटात ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ९० हून अधिकजण जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासानुसार, शाळेजवळ खाणकामाशी संबंधित स्फोटके (डायनामाइट) साठवून ठेवलेल्या घरामध्ये किंवा डेपोमध्ये झालेल्या निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाला. तालिबानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतीन कानी यांनी या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. स्फोटाची माहिती मिळताच तपास पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुनार प्रांतात ही दुर्घटना घडली. स्फोटाचे नेमके कारण आणि दुर्घटनेतील नुकसानीचा सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही.

कुनार प्रांताच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे संचालक मौलवी सामी-उल-हक यांनी याबाबत माहिती दिली. ज्या घरात हा स्फोट झाला, ते घर खाणकामाशी संबंधित व्यक्तींचे होते. या व्यक्तींनी घरात डायनामाइटचा साठा करून ठेवला होता, अशी माहिती सामी-उल-हक यांनी दिली. मात्र, स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका शाळेच्या परिसरात हँड ग्रेनेडने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ९ ते १४ वर्षे वयोगटातील ४० हून अधिक मुले जखमी झाली होती. त्यानंतर आता कुनार प्रांतात शाळेजवळ झालेल्या या स्फोटामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *