रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पं. राम मराठे महोत्सवाची सुरूवात

 रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पं. राम मराठे महोत्सवाची सुरूवात

ठाणे दि २८ – संगीत भूषण पं राम मराठे यांच्या नावाचा हा पुरस्कार मला माझ्या सर्व गुरूंच्या मार्गदर्शनामुळे संगीत रसिकांच्या पाठबळामुळे प्राप्त झाला आहे. संगीताने मला इथं पर्यंत आणले, जो पर्यंत श्वास सुरू आहे तो पर्यंत सनई वाजवता येऊ दे हीच देवाकडे प्रार्थना असून हा सन्मान माझा नसून सनईचा आहे. या पुरस्कारासाठी माझी निवड करणारी समिती, ठाणे महानगरपालिका, सर्व रसिक, माझे गुरुजन आणि मानवी-अमानवी आत्म्यांचा मी आभारी असल्याची भावना ज्येष्ठ सनईवादक पं शैलेश भागवत यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेच्या सहकार्याने 31 व्या पं राम मराठे स्मृती समारोहाचे उद्घाटन शुक्रवारी खासदार तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे अध्यक्ष नरेश म्हस्के यांच्या हस्ते राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाले. यावेळी संगीत भूषण पं राम मराठे राज्यस्तरीय पुरस्काराने ज्येष्ठ सनईवादक पं शैलेश भागवत यांना तर तर युवा पुरस्काराने हेमा उपासनी यांना सन्मानित करण्यात आले.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या उद्घाटन सोहळ्यास नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मिनल संखे, अ.भा.मराठी नाट्यपरिषदेच्या ठाणे शाखेचे कार्याध्यक्ष नरेंद्र बेडेकर, उपायुक्त दीपक झिंजाड, ज्येष्ठ सनईवादक पं. औरंगाबादकर, प्रसिद्ध तबलावादक पं मुकुंदराज देव, ज्येष्ठ गायक पं. मुकुंद मराठे, लोककला अभ्यासक डॉ प्रकाश खांडगे, श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे संजीव ब्रह्मे आदी उपस्थित होते.

यावेळी पं. शैलेश भागवत यांनी गुरुप्रतीआदर व्यक्त करीत गुरूवर्य पं औरंगाबादकर, पं मारूती पाटील, पं चारूदत्त नायगावकर, पं. प्रकाश चिटणीस यांच्यासारखे गुरू मला लाभले, त्यांनी मला वेळच्या वेळी कानपिचक्या देऊन शिकवले आणि त्यामुळे मी भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या पर्यंत जाऊन पोहचलो त्यांनी मला 40 वर्ष शिकवले .पं राम मराठे, गुरूवर्य भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ ही अतिशय साधी माणसं होती, संगीतात नवीन काही करत असताना शास्त्रीय संगीतातील अभिजातता आणि पावित्र्य राखणे हे मी या दोघांकडून शिकलो, या दोघांच्या चरणी लीन होत असल्याचे नमूद करीत ठाणे महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला त्यांनी धन्यवाद दिले.

         संगीत भूषण पं राम मराठे युवा पुरस्कार हा माझे वडील व गुरू पं. नाथ नेरकर यांना समर्पित करत असल्याचे हेमा उपासनी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. आपला जन्म संगीत घराण्यात झाला असून लहानपणापासून पं भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, उस्ताद झाकीर हुसेन यांना बघत आम्ही मोठे झालो. घरात गेली ५० वर्षे गुरूकुल परंपरा सतत राबत आली होती आणि त्यांचा परिणाम असा झाला की वयाच्या सातव्या वर्षापासून मी आकाशवाणीवर गाऊ लागले. शास्त्रीय संगीत हा माझा श्वास असून उर्दू गझल हा आवडीचा विषय असल्याचे सांगत हेमा उपासनी यांनी उर्दू गझल पेश केली.

भारतीय अभिजात संगीताच्या समृद्ध परंपरेला वंदन करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा पंडित राम मराठे स्मृती समारोह हा ठाणे शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पंडित राम मराठे यांनी आपल्या गायकी, अभिनय आणि संगीत साधनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात अढळ स्थान निर्माण केले आहे. संगीत साधना, समर्पण आणि कलेप्रती असलेली निष्ठा यांतून कलाकार मोठा होत असतो पं राम मराठे यांच्या स्मृती जपण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत संगीताचा वारसा पोहोचविण्याचे काम हा महोत्सव करीत असल्याचे प्रतिपादन खासदार तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे अध्यक्ष नरेश म्हस्के यांनी केले.

यंदाच्या समारोहात पं. शैलेश भागवत यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, याचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. शैलेश भागवत यांनी गेली 50 ते 52 वर्षे सातत्याने संगीतसेवा केली आहे. गुरुजनांचे मार्गदर्शन आणि संगीत साधनेतील सातत्य यामुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. युवा कलाकार हेमा उपासनी यांचा सन्मान हीदेखील आनंदाची बाब आहे. नव्या पिढीने शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि भारतीय कलापरंपरेशी जोडून राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नव्या कलाकारांना प्रोत्साहन, संधी आणि व्यासपीठ देण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा मराठी नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित असल्याचे खासदार म्हस्के यांनी नमूद केले.

शहराच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले की, उंच इमारती, रस्ते आणि पायाभूत सुविधा शहराला आधुनिक बनवतात; मात्र साहित्य, संगीत, नाट्य आणि संस्कृती शहराला खरी ओळख देतात. शहराची श्रीमंती केवळ इमारतींमध्ये नसते, तर अशा सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या कलाकारांमध्ये आणि रसिकांमध्ये असते. त्यामुळे ठाणे शहराची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध करण्यासाठी असे महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ML/Ml/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *