BSNL च्या तारा चोरणाऱ्या नऊ परप्रांतीयांना अटक
पुणे, दि. ११ : पुणे शहरात BSNL च्या भूमिगत तांब्याच्या तारा चोरणाऱ्या नऊ परप्रांतीय चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. रामटेकडी औद्योगिक वसाहतीतून क्रेनचा वापर करून हे चोरटे तारा काढत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक अल्फाज शेख, गोपाळ मदने, अर्षद सय्यद, अभिजित चव्हाण, सर्फराज देशमुख आणि गणेश भुजबळ यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अस्लम सगीर खान, सलमान इद्रीस मलिक (दोघे रा. दिल्ली), आरिफ कुंदनखाँ खान, शोएब हारून खान, नबी मोहम्मद शान मोहम्मद (तिघे रा. उत्तर प्रदेश), नरेशकुमार शिवशरण (रा. हरयाणा), तसेच अनिस अन्सारी, अफाक अन्सारी आणि प्रवीण बागुल (रा. हडपसर, पुणे) यांचा समावेश आहे.
वानवडी पोलिस रामटेकडी परिसरात सराईत गुन्हेगारांची चौकशी करत असताना, त्यांना रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या परिसरातून काही जण क्रेनच्या साहाय्याने भूमिगत तांब्याच्या तारा काढत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरट्यांना रंगेहाथ पकडले.
चोरट्यांकडून ३४ लाख ८० हजार रुपये किमतीची तांब्याची तार, एक क्रेन, एक ट्रक आणि एक दुचाकी असा एकूण ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
SL/ML/SL