पेट्रोल-डिझेल दरवाढ अटळ असल्याची चिन्हे
कंपन्यांना रोज होतोय ₹ १,७०० कोटींचा तोटा
मुंबई दि ११ ( विक्रांत पाटील )
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. दैनंदिन स्तरावर हा आकडा १,६०० ते १,७०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर स्थिर राहिल्याने या कंपन्यांवर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला आहे, ज्यामुळे इंधन दरवाढ आता अटळ असल्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्याच्या आकडेवारीनुसार, तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर १४ ते १८ रुपये आणि डिझेलवर १८ ते ३५ रुपयांपर्यंत तोटा (अंडर-रिकव्हरी) सहन करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून किरकोळ विक्री दरात मोठी वाढ करण्यात आली नसली तरी, आता वाढत्या तोट्यामुळे १५ मे २०२६ पर्यंत इंधन दरात प्रति लिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जरी पेट्रोलियम मंत्रालयाने सध्यातरी ‘तातडीने दरवाढ करण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही’ असे म्हटले असले तरी, वाढती आर्थिक तूट आणि तेल कंपन्यांची ढासळती स्थिती पाहता ही दरवाढ अधिक काळ रोखणे सरकारला कठीण जाणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला उद्देशून केलेल्या भाषणात इंधन बचतीचे आवाहन केले आहे, ज्यामुळे दरवाढीच्या शक्यतांना अधिक बळ मिळाले आहे. परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करण्यासाठी नागरिकांनी कारपूलिंग आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील विस्कळीत पुरवठ्यामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली ऊर्जेची टंचाई आणि इंधनासाठी द्यावे लागणारे वाढीव परकीय चलन लक्षात घेता, सरकार आता ग्राहकांना या जागतिक महागाईचे चटके हळूहळू सोसावे लागण्याची पूर्वतयारी करत असल्याचे दिसून येत आहे.
तेल कंपन्यांचा तोटा
(प्रति लिटर)
- पेट्रोल: १४ ते १८ रुपये
- डिझेल: १८ ते ३५ रुपये
- दैनंदिन तोटा: १,६०० ते १,७०० कोटी
- दरमहा तोटा: ३०,००० कोटी रुपयये
- संभाव्य दरवाढ: ४ ते ५ रुपये प्रति लिटर
ML/ML/MS