विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांवरील बंदी होणार अधिक कठोर

 विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांवरील बंदी होणार अधिक कठोर

मुंबई दि २७ : राज्यात नैसर्गिकरित्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्रीस आधीपासूनच बंदी असली तरी ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. या निर्णयामध्ये केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन व विक्रीच नव्हे, तर सजावटीसाठी त्यांचा वापर करणारे डेकोरेटर्स तसेच अशा सजावटीस परवानगी देणारे मोठे मॅरेज हॉल्स आणि बँक्वेट हॉल्स यांच्यावरही कारवाईची स्पष्ट तरतूद केली जाणार जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कृत्रिम व प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून सातत्याने होत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक फुलांचा तसेच कमी दर्जाच्या प्लास्टिक खेळण्यांचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवर उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सध्या बाजारात कृत्रिम फुलांच्या विक्रीचे अक्षरशः पेव फुटले आहे. अनेक वेळा खरी फुले आणि प्लास्टिक फुले यातील फरक ओळखणेही कठीण होते. विघटन न होणाऱ्या फुलांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून नैसर्गिक फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विषयावर पर्यावरण विभाग अधिक काटेकोरपणे कारवाई करेल आणि गरज भासल्यास इतर संबंधित विभागांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्लास्टिक बंदीचा जीआर असतानाही अनेक महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा भाजप आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी जर जीआरची अंमलबजावणी करत नसतील, तर त्यांच्यावर कोणती कारवाई होणार याचाही स्पष्ट उल्लेख नव्या शासन निर्णयात करावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान यापूर्वी झालेल्या चर्चेत सहभागी होताना मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण विभागाकडून झालेल्या कारवाईची माहिती दिली. गेल्या चार-पाच वर्षांत सुमारे ९२ हजार ठिकाणी प्लास्टिक बंदीचे उल्लंघन आढळून आले असून ४१३५ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या कारवाईतून सुमारे २५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पहिल्यांदा उल्लंघन केल्यास ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार रुपयांचा दंड, तर तिसऱ्यांदा तीन महिन्यांचा कारावास व २५ हजार रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेने दादर फुल मार्केटमधील फुल विक्रेत्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली तिथून हटवले आहे. त्यामुळे मुंबई फुल विक्रेता असोशिएशने बंद पुकारला असून सध्या फुलविक्री पुर्णपणे बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करत हा बंद मागे घेण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतची माहिती घेऊन हा बंद मागे घेण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *