सिमेंट रोलरच्या धडकेत दोन्ही पाय चिरडलेल्या कामगारावर लिलावती रुग्णालयात झाले मोफत उपचार
मुंबई, दि २७: लीलावती हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने सामाजिक बांधिलकी जपत ३५ वर्षीय बांधकाम कामगार योगेश मधुकर चौधरी यांच्यावर मोफत उपचार सुरू केले असून रुग्णाची प्रकृतीत टसुधारणा दिसून आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
३५ वर्षाय योगेश चौधरी यांना बांधकामाच्या साईटवर काम करत असताना मागून येणाऱ्या सिमेंट रोलर ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना २९ जानेवारी २०२६ रोजी दहिसर येथील नवनीत हाय-टेक चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक प्रगत शस्त्रक्रियेची गरज असल्याने रुग्णाला लिलावती रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
१५ फेब्रुवारी २०२६ रोजी लिलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तज्ज्ञांनी तात्काळ उपचार सुरू केले. प्लास्टिक सर्जन डॉ सुशील नेहते यांच्या नेतृत्वाखाली रुग्णावर शस्त्रक्रिया व आवश्यक उपचार करण्यात आले. रुग्णालयाने स्पष्ट केले की, सर्व उपचार त्यांच्या पूर्णपणे मोफत पुरविले जात आहेत.
रुग्णालयाचे विश्वस्त श्री राजीव मेहता म्हणाले, योगेश चौधरी यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. संपूर्ण उपचाराचा खर्च हा ट्रस्टतर्फे उचलला जात आहे.
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, काही व्यक्तींनी सोशल मीडियावर आरोप करत रुग्णालय व विश्वस्तांविरुद्ध दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली. उपचार नाकारल्याच्या किंवा विलंब झाल्याच्या सर्व आरोपांचे रुग्णालयाने फेटाळले आहे. आपत्कालीन उपचार पुरवताना रुग्णावर कोणतीही आर्थिक अट घालण्यात आलेली नाही, असेही प्रशासनाने नमूद केले.
रुग्णाची आई प्रमिला चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “माझ्या मुलाला आपत्कालीन परिस्थितीत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोणतीही ठेव रक्कम न मागता डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. उपचार नाकारल्याचे आरोप हे पूर्णपणे चुकीचे आहेत.
स्थायी विश्वस्त श्री. राजीव किशोर मेहता यांनी ट्रस्टशी संबंधित १,२४३ कोटींच्या आर्थिक प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, सद्य व्यवस्थापनानेच पारदर्शकतेच्या दृष्टीने हे प्रकरण उघडकीस आणले असून संबंधित माजी विश्वस्तांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रस्टने त्यांचे स्थायी विश्वस्त श्री. प्रशांत मेहा यांच्यामार्फत अनेक एफआयआर नोंदवले, पारदर्शकता दाखवली आणि कारवाईची मागणी केली. ट्रस्ट मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला पूर्ण सहकार्य करत आहे. आम्ही मुख्य आरोपी माजी विश्वस्तांविरुद्ध ठोस चौकशी कारवाईची वाट पाहत आहोत. त्यांच्या आर्थिक व्यवहाराची छाननी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर येईल ज्यामध्ये डॉ. नीरज उत्तमानी यांच्यासह कोणत्याही कार्यरत अधिकाऱ्याचा काही सहभाग होता का हे देखील स्पष्ट होईल.
रुग्णालयाने प्रशासनाने सांगितले की, लिलावती रुग्णालय समाजासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यास सक्षम आहे. खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर पावले उचलली जातील. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत दाखल झालेल्या योगेश चौधरी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.KK/ML/MS