प्रहार – नवीन राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण जाहीर
नवी दिल्ली, दि. २४ : देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. गृह मंत्रालयाने देशाचे नवीन राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण आणि रणनीती जाहीर केली असून, याला ‘प्रहार’ (PRAHAAR) असे नाव देण्यात आले आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये दहशतवादाचे स्वरूपही बदलत असून, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे व्यापक धोरण तयार करण्यात आले आहे.
‘प्रहार’ या शब्दाचा अर्थ भारतीय नागरिक आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी दहशतवादी हल्ले रोखणे, असा आहे. या धोरणांतर्गत धोक्याच्या तीव्रतेनुसार तत्काळ आणि प्रमाणबद्ध प्रतिसाद देण्याची यंत्रणा विकसित केली जाणार आहे. यामध्ये सर्व सरकारी विभागांना एकत्र आणून अंतर्गत क्षमता वाढवणे, कट्टरतावाद रोखणे आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या परिस्थितीला आळा घालणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. विशेष म्हणजे, या सर्व प्रक्रियेत मानवी हक्क आणि कायद्याच्या राज्याचे पालन करण्यावरही भर देण्यात आला आहे.
प्रहार धोरण दहशतवाद आणि हिंसक अतिरेकीपणाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्याचे काम करेल.
गृह मंत्रालयाच्या वेबसाइटवर जारी केलेल्या दस्तऐवजानुसार, सायबर हल्ले रोखणे आणि सोशल मीडियावर दहशतवादी कारवायांना आळा घालणे या धोरणात समाविष्ट असेल.
कट्टरतावाद आणि हिंसक अतिरेकीपणाचा सामना करण्यासाठी उत्तम पावले उचलणे या धोरणाचा भाग असेल.
धोरणात इंटेलिजन्स ब्युरो (IB) अंतर्गत काम करणाऱ्या जॉइंट टास्क फोर्स ऑन इंटेलिजन्स (JTFI) चा उल्लेख करण्यात आला आहे.
भारत सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, दहशतवादाच्या कोणत्याही रूपाचे समर्थन केले जाणार नाही. भारताचे हे धोरण ‘झिरो टॉलरन्स’ म्हणजेच शून्य सहनशीलतेवर आधारित आहे.
भविष्यातील धोके लक्षात घेऊन खाजगी क्षेत्रासोबत भागीदारी आणि प्रगत तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा दहशतवादी हेतूंसाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय समुदायासोबत मिळून काम करणार आहे.
SL/ML/SL