महाड येथील श्री वीरेश्वर महाराज मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य चित्र अर्पण
महाड, दि २४– इतिहासप्रेमी व संशोधक कलाकार यश घरटकर यांनी आज महाड येथील वीरेश्वर महाराज मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ४ फूट x ३ फूट आकाराचे भव्य चित्र अर्पण केले. सदर चित्र सध्या मंदिरात दर्शनासाठी प्रदर्शित करण्यात आले आहे.
हे चित्र मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) मध्ये जतन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ चित्रावर आधारित आहे. ऐतिहासिक संदर्भ, अभ्यास आणि संशोधनाच्या आधारे हे चित्र साकारण्यात आले आहे.
मांजरपाट कापडावर अॅक्रेलिक रंगांमध्ये साकारलेले हे चित्र महाराजांच्या राजस आणि ऐश्वर्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवते. चित्रात छत्रपती शिवाजी महाराज डाव्या हातात त्यांचे आवडते शस्त्र ‘यशवंत’ नावाचा पट्टा आणि उजव्या हातात भवानी तलवार धारण केलेल्या तेजस्वी मुद्रेत उभे असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
या चित्रामागील उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची खरी आणि संशोधनाधिष्ठित प्रतिमा जनतेसमोर आणणे हा आहे. कलाकार यश घरटकर यांनी यापूर्वीही महाराजांच्या मूळ चित्रांवर संशोधन व प्रबंध कार्य पूर्ण केले असून त्याच अभ्यासाच्या आधारे ही कलाकृती साकारली आहे.
मंदिर समितीने दिलेल्या या संधीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, “ही सेवा करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी आशीर्वादासमान आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.KK/ML/MS