अखेर नऊ महिन्यांनंतर संपला सत्तासंघर्षावरील युक्तीवाद, निर्णय न्यायालयाकडे राखीव
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गेल्या महिन्याभरापासून चालू असलेली सुनावणी अखेर आज संपली आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी २९ जूनला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा मुद्दा उपस्थित झाला. न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे.
१४ फेब्रुवारीपासून १२ दिवस दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. न्यायालयाने जवळपास ४८ तास दोन्ही बाजूंचे आणि राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल यांचे युक्तिवाद ऐकले. दोन्ही बाजूंचे फेरयुक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आता सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट करत निकाल राखून ठेवल्याची घोषणा केली.
ही सुनावणी सुरू होण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने हा एक महत्त्वपूर्ण खटला असल्याचं नमूद केलं होतं. त्यानुसार तीन दिवसांची मुदत दिलेली सुनावणी तब्बल तीन आठवडे चालली. आता महाराष्ट्रासह अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाचं आणि जनतेचं लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं आहे. या खटल्यावरील न्यायालयाचा निर्णय भविष्यात सर्वच राजकीय कुरघोडींच्या प्रकरणात मार्गदर्शक ठरणार आहे.
दरम्यान शिवसेना नाव आणि चिन्हावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. .ही सुनावणी उद्या शुक्रवारी होणार होती पण आता २४ एप्रिल रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना दिला, आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे.
SL/KA/SL
16 March 2023