TCS प्रकरण : आरोपी निदा खानला पोलिस कोठडी
नाशिक दि ८ : नाशिकमधील चर्चित TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने न्यायालयाकडे सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. यापूर्वी याच न्यायालयाने निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्याने पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता आधीपासूनच असल्याचे बचाव पक्षाने सांगितले.
आरोपीच्या वतीने बाजू मांडताना वकील राहुल कासलीवाल यांनी सरकारी पक्षाच्या काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला. बुरखा वापरण्याचा मुद्दा सरकारी पक्षाने उपस्थित केला असला तरी बुरखा ही कोणतीही प्रतिबंधित वस्तू नसून तो कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच मोबाईल ॲप डाउनलोड करून लिंक पाठवल्याचा आरोपही करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना लिंक पाठवणे किंवा मिळवणे हे तांत्रिकदृष्ट्या अवघड नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित मोबाईल आधीच पोलिसांनी जप्त केला असून त्यामधील सर्व माहिती उपलब्ध आहे. सध्या केवळ तोंडी विचारपूस सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निदा खान गर्भवती असल्याचा मुद्दाही न्यायालयात मांडण्यात आला. एका गर्भवती महिलेला किती दिवस पोलिस कोठडी द्यावी, याचाही न्यायालयाने विचार करावा, अशी विनंती बचाव पक्षाकडून करण्यात आली.
राहुल कासलीवाल यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाला कायद्यातील तरतुदींचा वापर करण्याचा अधिकार आहे. त्यामुळेच निदा खान यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. केवळ गुन्हा दाखल झाला म्हणून एखाद्या व्यक्तीने स्वतःहून हजर व्हावे, असे बंधन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, न्यायालयाने निदा खान हिच्या वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. तिच्या आईला केअर टेकर म्हणून भेटण्याची परवानगी देण्यात आली असून मेडिकल असिस्टंट देण्यासही न्यायालयाने संमती दर्शविली आहे.ML/ML/MS