श्री राम नवमी

 श्री राम नवमी

मुंबई, दि. 17 (जाई वैशंपायन) : आज चैत्र शुद्ध नवमी, राजाधिराज भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्मदिवस.अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता यावर्षी या दिवसाचे महत्त्व वेगळे आहे, हे खरेच! परंतु, मराठी माणसाचे चैत्री नवरात्र गीतरामायणाविना पूर्ण होऊच शकत नाही. आधुनिक वाल्मीकी अर्थात ग.दि.
माडगूळकर यांच्या शब्दसुमनांनी आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या स्वरगंधाने आजचा दिवस मराठी मनात सतत दरवळत राहतो तो असा

चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला…
राम जन्मला गं सखी राम जन्मला…

तीव्र उन्हाळ्यात – अगदी वणव्यासारखा भाजणारा वैशाख नसला तरी उष्ण वाऱ्याची झळ देणारा चैत्र महिना.. डोक्यावर आलेला सूर्य.. सर्वथा आदर्श अशी अयोध्यानगरी राजप्रासादातून येणाऱ्या शुभवार्तेच्या प्रतीक्षेत.. अर्थात त्या झळांमध्ये वसंतातील फुलांचा संमिश्र सुगंध मिसळला आहे, त्यामुळे त्यांची दाहकता कमी भासते आहे.. परंतु प्रतीक्षेचा प्रहर लांबला तर अयोध्या जणू पोळलीच जाईल, अशी तिची राजाशी एकरूपता ! अयोध्यावासीच काय, परंतु सूर्यवंशातील गोड बातमी ऐकण्यासाठी उत्सुक असणारा सूर्यही डोक्यावर थांबला.. नि त्या तापल्या क्षणावर शीतल शिडकावा करण्यासाठीच जणू रामजन्म झाला ! मग पुढे काय सांगता…

साक्षात सूर्याचा वारसा सांगणारे हे नवजात अर्भक अतिशय तेजस्वी होते, ते पाहून आईचेच डोळे दिपले! गीतातील यानंतरचे शब्द आणि सूर म्हणजे, दोन पुरुषांनी घेतलेली प्रसववेदनेची अनुभूती आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही-

ओघळले आसू सुखे कंठ दाटला
राम जन्मला गं सखी राम जन्मला..

माता कौसल्येची उत्कट भावावस्था सांगणारी ही ओळ ऐकून आपण रामजन्माच्या आनंदात बुडून जाणार, तोच त्या राजवंशाचा आनंद त्यांच्या भोवतीच्या पशुपक्ष्यांमध्ये, फुलापानांमध्ये कसा प्रतिबिंबित झाला, ते कानावर पडून आपण थक्क होतो. या वार्तेने गायी पान्हावल्या आणि पेंगुळलेल्या कळ्या भर उन्हात उमलल्या! निसर्गाशी इतके एकरूप होणारे मन (रघुवंशाचे आणि गदिमांचेही) किती पवित्र असले पाहिजे ! पुढे जाऊन कविवर्य विविध प्रकारच्या नादांबद्दल आणि आवाजांबद्दल उल्लेख करून अयोध्या नगरीच्या सांस्कृतिक संपन्नतेची झलक दाखवतात आणि त्या संदर्भात पुन्हा निसर्गाकडे येतात –

वाऱ्याचा आवाज, युवतींच्या चमूची गीते, प्रमुदित प्रजेचे हास्याचे आवाज, त्यात विरणारे त्यांचेच शब्दसंवाद, तालवाद्यांनी पकडलेली द्रुतलय, वीणांचे झंकार, त्यांच्याही वर उठणारा नूपुरांचा नाद, सुवार्ता सांगण्यासाठी या कल्लोळापेक्षा अधिक आवाज असावा म्हणून तापणारे कर्णे.. आणि या सुखमय कोलाहलात बावरून मूक झालेल्या परंतु स्वर्गस्वर लाभलेल्या कोकिळा ! तेथेही गदिमांचे सृजनाच्या ऋतूचे भान विलक्षण आहे-

आम्रशिरी बसलेल्या कोकिलांच्या निमित्ताने ते नवी पालवी फुटलेल्या तरुवरांचेही स्मरण करून देतात. आधीच्या एका गीतात राजा दशरथ आणि तिन्ही राण्या यांच्या अपत्यहीनतेबद्दल बोलताना ते ‘कल्पतरूला फूल नसे का, वसंत सरला तरी’ असे म्हणून जातात. आणि आता रामजन्माच्या या गीतात वसंताचा हा हलकासा उल्लेख ते सगळे संदर्भ लख्ख सांगून जातो – म्हणूनच गदिमांना शब्दप्रभू म्हणतात !

गीताच्या शेवटाकडे येताना आपल्या लक्षात येते की – रामजन्माचा आनंद राजप्रासादातून ओसंडून अवघ्या अयोध्येच्या चराचरात तर पोहोचलाच, परंतु तिच्याही सीमा ओलांडून तो दिगन्तापर्यंत पोहोचला ! याचे कारण सोपे आहे हो, तो काही साध्यासुध्या बालकाचा जन्म नव्हता, तर तो विष्णूचा अवतार, साक्षात ‘विग्रहवान् धर्म’ (मूर्तरूप घेतलेला साक्षात धर्म), मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म होता !

जगन्नियंत्याच्या त्या अवताराचा जन्म पंचमहाभूतांनीही साजरा केला आणि अष्टदिशांनीही. सारी पृथ्वी नि तिला तोलणारा शेषही रामावताराच्या प्रारंभाने आनंदित होऊन डोलू लागले आहेत, असे वर्णन या गीतात ऐकतो, आपणही नकळत डोलूनच गाण्याला दाद देतो नि त्याच- रामजन्माच्याच आनंदाचा एक भाग होतो ! म्हणून खऱ्या अर्थाने हे गीत मराठी मनाच्या मातीत रुजते आणि पिढ्यानपिढ्या उमलत राहते.

आज आणखी एक दिनविशेष म्हणजे, प्रभू रामचंद्रांच्या दासोत्तमाचीही हीच जयंती. न्यायप्रिय रामाचा नि धुरंधर कृष्णाचा समृद्ध वारसा घेऊन महाराष्ट्रात रामराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवरायांना जे गुरुस्थानी होते त्या समर्थ रामदास स्वामींचीही आजच जयंती, हा योगायोग विलक्षण आहे ! रामनवमीच्या निमित्ताने जसे रामचरित्रातील अनेकोत्तम गुणांचे स्मरण केले पाहिजे, तसे रामदास जयंतीच्या निमित्ताने भक्त हनुमंताच्या आणि समर्थ रामदासांच्या बलसंपदेचे स्मरण केले पाहिजे. म्हणजे मग बलसागर भारताचा पाया रचता येईल.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे, “आकाशात ‘तेजस’ आणि सागरात ‘विक्रांत’ असे पराक्रम करणारा नवभारत आपल्याला घडवायचा आहे, भारताचा अभ्युदय घडवायचा आहे.” या उदात्त ध्येयासाठी आपण स्वयंस्फूर्तीने कामाला लागले पाहिजे. या राष्ट्रकार्यात प्रत्येकाला ‘राम’ होता येणार नाही, हे तर खरेच… परंतु ‘वानर’ होऊन योग्य रामास सामूहिक सहाय्य करणे, ‘खार’ होऊन आपल्या वाटचे काम उचलणे, ‘जटायू’ होऊन वाईटाशी दोन हात करण्यासाठी प्राणांची बाजी लावणे, ‘शबरी’ होऊन सेवाभाव जपणे, ‘बिभीषण’ होऊन धैर्य आणि न्यायनिष्ठा सिद्ध करणे… असे आपल्यावरील दायित्वाचे कित्येक पैलू आहेत! ते आपण अंगीकारले आणि पेलले पाहिजेत… तीच खरी रामरायाची आराधना !

JW/ML/PGB 17 APR 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *