महागाईने गाठली पाच महिन्यातली सर्वोच्च पातळी
नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अन्नधान्याच्या किंमती वाढल्यामुळे डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ महागाई (Retail inflation) 5.59 टक्क्यांवर पोहोचली. सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई नोव्हेंबर 2021 मध्ये 4.91 टक्के आणि डिसेंबर 2020 मध्ये 4.59 टक्के होती.
किरकोळ महागाईने (Retail inflation) गेल्या 5 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई वाढून 4.05 टक्क्यांवर पोहोचली आहे, जी त्याच्या आधीच्या महिन्यात 1.87 टक्क्यांवर होती.
रिझर्व्ह बँक आपल्या द्वि-मासिक आर्थिक आढाव्यात प्रामुख्याने किरकोळ महागाई (Retail inflation) वाढीची आकडेवारी पाहते. आधारभूत परिणाम प्रतिकूल झाल्यामुळे उर्वरित आर्थिक वर्षात महागाईवाढीचा आकडा उच्च राहील, असे मध्यवर्ती बँकेचे मत आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण महागाईचा दर सर्वोच्च पातळीवर असेल. त्यानंतर तो खाली येईल.
नोव्हेंबर 2021 मध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन 1.4 टक्क्यांनी वाढले. बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन 1.6 टक्क्यांनी कमी झाले होते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन 0.9 टक्क्यांनी वाढले. समीक्षाधीन महिन्यात खनिज उत्पादनात पाच टक्के आणि वीज निर्मितीमध्ये 2.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान औद्योगिक उत्पादन 17.4 टक्क्यांनी वाढले, जे मागील आर्थिक वर्ष 2020-21 च्या याच कालावधीत 15.3 टक्क्यांनी घसरले होते. मार्च 2020 मध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यावेळी त्यात 18.7 टक्क्यांनी घसरण झाली होती. साथ रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘टाळेबंदी’मुळे एप्रिल 2020 मध्ये त्यात 57.3 टक्क्यांनी घट झाली होती.
Retail inflation rose to 5.59 per cent in December 2021 on account of rising food prices. This is according to figures released by the government on Wednesday. Retail inflation based on Consumer Price Index (CPI) was 4.91 per cent in November 2021 and 4.59 per cent in December 2020.
PL/KA/PL/13 JAN 2022