प्रधानमंत्री आवास योजनेच्या १५ लाख घरांचे वितरण पुढील वर्षी…
सातारा, दि. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रधानमंत्री आवास योजनेत विक्रमी कामगिरी केली असून, एका वर्षात तब्बल पाच लाख घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना चाव्यांचे वितरण करण्यात आले आहे. पुढील वर्षी आणखी १५ लाख घरांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित घरकुल वितरण सोहळ्यात ते बोलत होते. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले , खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले कराड, उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, ग्रामविकास विभागा चे अप्पर सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०१६ ते २०२२ या कालावधीत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला १२ लाख ९० हजार घरांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यानंतर नव्याने अनेक गरजू कुटुंबांची नावे समोर आल्याने आणखी ३० लाख घरांची गरज निर्माण झाली. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला असून, पुढील दोन ते तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात घरकुलांचे वितरण होणार आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक घरकुलासाठी अतिरिक्त ५० हजार रुपयांची मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना सौरऊर्जेसाठी अनुदान देऊन आयुष्यभर मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असून केंद्र सरकारच्या सहकार्याने त्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही केंद्रीय स्तरावर बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचाही निर्णय सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना फडणवीस म्हणाले, गेल्या दोन वर्षांत राज्यातील ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्यात यश आले असून, हा आकडा एक कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचाही उल्लेख करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. “हे सरकार सर्वसामान्य, शेतकरी आणि कामगारांचे सरकार आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना देशहितासाठी ऊर्जा बचतीचे आवाहन केले.विक्रमी वेळेमध्ये ग्रामविकास विभागाने पाच लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल ग्रामविकास विभाग त्या विभागाचे तत्कालीन सचिव आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे मुख्यमंत्र्यांनी तोंड भरून कौतुक केले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार यांनी घरकुल उद्दिष्ट पूर्तीचे शिव धनुष्य यशस्वीपणे पेलले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले .ML/ML/MS