अखेर पेट्रोल , डिझेल महागलेच
मुंबई, दि. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल- डिझेलचा वापर कमी करा असा सल्ला मागील आठवड्यातच दिला होता. त्यावेळीच लवकरच इंधनाचे दर वाढणार असल्याचे सुतोवाच झाले होते. उन्हाळ्याच्या झळांनी त्रासलेल्या आणि सिलिंडर टंचाईने ग्रासलेला नागरिकांना आजपासून पेट्रोल डिझेलच्या महागाईची झळही बसणार आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति ३ रूपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता मुंबईत पेट्रोल 106.68 वर गेले तर डिझेल 93.14 रूपयांवर पोहोचले आहे. दिल्लीत आता पेट्रोल 97.77 रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेलची किंमत 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे.
या वाढीचे मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्ध सुरू होण्यापूर्वी क्रूड ऑइलचे दर 70 डॉलर होते, जे आता वाढून 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. क्रूडच्या किमती वाढल्याने तेल कंपन्या दबावाखाली होत्या. त्यामुळे कंपन्यांनी तोट्याची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये दीर्घकाळ वाढ कायम राहिली, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढवल्या जाऊ शकतात.
यापूर्वी, सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यासाठी विशेष उत्पादन शुल्कात 10-10 रुपयांची कपात केली होती. पेट्रोलवरील शुल्क ₹13 प्रति लिटरवरून ₹3 पर्यंत कमी करण्यात आले होते, तर डिझेलवरील शुल्क ₹10 वरून शून्य करण्यात आले होते. केंद्र सरकारकडून एका लिटर पेट्रोलवर एकूण 21.90 रुपये उत्पादन शुल्क वसूल केले जात होते.
SL/ML/SL