भंडारा उधळण्याबाबत जेजुरी गडावर नवीन नियम लागू
पुणे, दि. १४ : जेजुरीत भंडाऱ्यामुळे आग लागण्याच्या घटना आणि भेसळीच्या तक्रारी पाहता, भाविकांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे जेजुरीतील भंडाऱ्यासाठी विशेष धोरण निश्चित केले जाणार असून, त्यात शुद्धता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
जेजुरी आणि इतर देवस्थानांच्या ठिकाणी विकला जाणारा ‘हळद भंडारा’ हा शुद्ध हळदीच्या स्वरूपातच असावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. आता प्रत्येक विक्रेत्याला अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 नुसार अधिकृत अन्न परवाना घेणे अनिवार्य असेल. विनापरवाना किंवा भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवर आता थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
“जेजुरी हे महाराष्ट्राचे सुवर्ण मंदिर आहे. येथील भंडाऱ्याची शुद्धता राखणे ही आमची जबाबदारी आहे. भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखत त्यांना सुरक्षित आणि शुद्ध हळद भंडारा मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे जेजुरीतील भंडाऱ्याला आता एक कायदेशीर ओळख मिळणार आहे.