६०० किलो चांदी घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा अपघात, दोन ठार

 ६०० किलो चांदी घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा अपघात, दोन ठार

पालघर दि १५ : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. चारोटी ब्रिज परिसरात चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्त वाहनात तब्बल ६०० किलो चांदी वाहतूक केली जात होती.

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी ब्रिज जवळ आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.मुंबईहुन गुजरातच्या दिशेने जाणारी व्हॅन नाकोडा बुलियन, मुंबई इथून मोदीसन लिमिटेड, वापी गुजरात येथे ६०० किलो वजनाच्या चांदीच्या २० प्लेट घेऊन जात होती. दरम्यान चारोटी ब्रिज परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही व्हॅन प्रथम गुजरात लेनवरील डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर मुंबई जाणाऱ्या लेन मध्ये शिरली. याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरला व्हॅनची जोरदार धडक बसली.

या भीषण अपघातात चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त वाहनातील ६०० किलो वजनाच्या चांदीच्या २० प्लेट सुरक्षित अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ज्यांची बाजरात किंमत अंदाजे 17 कोटी 66 लाख इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *